कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. इतके दिवस लतीकाला त्रास देणारा दौलत अखेर जेलमध्ये गेलेला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दौलतने विद्या मॅडमला कीडनॅप केले होते, हे लतीकाला एका प्रिस्कीप्शनच्या माध्यमातून समजले. मी किडनॅप झालीये हे विद्या मॅडमने उलट उलट अक्षरात लिहून दिले होते. औषधांची ही चिठ्ठी लतीकापर्यंत पोहोचते आणि ती अक्षरांची जुळवाजुळव करते. कारखानीसांनी भेटल्यावर मात्र लतीकाला दौलतच्या प्लॅनचा उलगडा होतो. यातूनच देवा लतिकाचा खून करतो असा प्लॅन ते रचतात. दौलतच्या तावडीतून आईला वाचवण्यासाठी दौलतचा प्लॅन तो स्वीकारतो.
खरं तर देवा लतीकाचा खून करतो हे मालिकेसाठी धक्कादायक होतं. मात्र हा सर्व लतीकाच्या प्लॅनचा हिस्सा असल्याचे समजताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. दौलत आणि त्याच्या पत्नीला चांगलीच अद्दल घडली असल्याने प्रेक्षकांनी लतिकाच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे म्हटले आहे. या ट्विस्ट नंतर दौलतचे पात्र मालिकेतून कायमची एक्झिट घेत आहे. दौलतच्या विरोधी भूमिकेने अभिनेता ऋषीकेश शेलार प्रचंड लोकप्रिय झाला. नायक नायिकेला जेवढी प्रसिद्धी मालिकेने मिळवून दिली, तेवढीच प्रसिद्धी ऋषिकेशला सुद्धा मिळाली. मात्र आता या पात्राची निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने ऋषीकेशने यावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ऋषीकेश म्हणतो की, अलविदा ना पब्लिक! आज सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील माझा ‘दौलत’ या पात्राचा प्रवास संपतोय.
गेलं अडीच वर्ष हे पात्र साकारताना मजा आली. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. दौलत हे पात्र रंगवण्यात लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार आणि टेक्निकल टीम ह्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. स्टोबेरी पिक्चर्स यांनी मालिकेची निर्मिती केल्याबद्दल धन्यवाद. कलर्स मराठीचे विशेष आभार, कारण एखादी भूमिका आपण बरी करू शकू असा विश्वास नट म्हणून आपल्याला स्वतःविषयी अनेकदा वाटतच असतो. पण आपल्यावर विश्वास ठेवून योग्य वेळी संधी देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ही संधी कलर्स मराठीनी मला दिली. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. कारण जेवढं प्रेम तुम्ही दौलतला दिलंत, तेवढं प्रेम त्याच्या आयुष्यात आलेल्या एकाही मुलीनं किंवा त्याच्या स्वतःच्या आईनं सुद्धा त्याला कधी दिलं नाही.