आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं कशी दिसतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांच्या घरी चुमिकल्या पाऊलांचे आगमन झाले. त्यात सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील दौलतच्या पात्राने मोठी लोकप्रियता मिळवलेली होती. सध्या दौलतच्या पात्राने मालिकेतून एक्झिट घेतलेली आहे. ही भूमिका साकारणारा ऋषीकेश शेलार सध्या झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून अधिपतीची प्रमुख भूमिका साकारत आहे. ही मालिका मिळण्याचा आनंद साजरा करत असतानाच ऋषीकेशला कन्यारत्न प्राप्ती झाली.
१३ जानेवारी रोजी ऋषीकेशची पत्नी स्नेहाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे कुटुंबाचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. एप्रिल महिन्यात त्याच्या लेकीचं बारसं साजरं करण्यात आलं. रुही असं तिचं नामकरण करण्यात आलं. रुही आता जवळपास चार महिन्यांची झाली आहे. ऋषीकेश अनेकदा मालिकेच्या शूटिंगनिमित्ताने कोल्हापूरला असतो, त्यामुळे तो रुहीला खूप कमी वेळा भेटतो. पण जेव्हा या बापलेकीची भेट होते तेव्हा तो क्षण ऋषीकेश त्याच्या कॅमेऱ्यात टिपून ठेवतो. आठवड्याचे शूटिंग आटोपून ऋषीकेश नुकताच त्याच्या घरी पोहोचला आहे. रुही सोबतचा एक क्युट फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. देखण्या रुहीला पाहून त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एवढेच नाही तर मराठी सेलिब्रिटींनी देखील रुहीला पाहून किती गोड मुलगी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. ऋषीकेश शेलार आणि पत्नी स्नेहा काटे शेलार हे दोघेही अभिनय क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारत असताना सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने ऋषीकेशच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. यातील दौलतचे पात्र विरोधी असले तरी प्रेक्षकांनी त्याच्या पात्रावर प्रचंड प्रेम दाखवलं. आपल्या सहजसुंदर अभिनयाने विरोधी भूमिकेतूनही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. याचाच फायदा म्हणून त्याला झी मराठी वाहिनीने नायकाची भूमिका देऊ केली. अधिपतीच्या भूमिकेमुळे ऋषीकेश शेलार प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.