कलाकार नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर एक्टीव्ह असल्याचं आपण पाहतो. पण याच कलाकार त्यांना नागरीक म्हणून येणाऱ्या समस्या, अडचणी याविषयीही सोशल मीडियावर व्यक्त होण्याची संधी सोडत नाहीत. अभिनेता दिग्दर्शक निर्माता हेमंत ढोमे यानेही तो राहत असलेल्या भागातील पाण्याचा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडवला. हेमंत ढोमेने पाणी टंचाईबाबत केलेलं टवीट इतकं चर्चेत आलं की त्याच्या बिल्डिंगमधली पाण्याची समस्या मुंबई महापालिकेला एका दिवसात निकाली लावणं भाग पडलं. हेमंत ढोमे हा गोरेगावमधील ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीत पाण्याची मोठी समस्या होती. सेलिब्रिटी कलाकार असले तरी त्यांचं रोजचं जगणं हे सामान्य माणसासारखंच असतं.

माणसाला ज्या गरजा आहेत त्या त्यांच्याही असतात. त्यामुळेच हेमंत ढोमे त्याच्या इमारतीतील रहिवाशांसोबत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पालिकेशी पत्रव्यवहार करत होता. पण बिल्डर आणि महापालिका यांच्या वादात या इमारतीतील रहिवाशांना पाण्यापासून वंचित रहावं लागत होतं. वारंवार तक्रार करूनही पालिकेने दखल घेतली नाही तेव्हा हेमंत ढोमे याने उचललेल्या पावलाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हेमंत ढोमे हा एक कलाकार आहे. केवळ पडद्यावरच्या भूमिकेत कलाकार संवेदनशील नसतात तर प्रत्यक्ष आयुष्यात येणाऱ्या समस्यांची प्रकर्षाने जाणीव असणं. आणि त्यासाठी लढा देणं या गोष्टीही कलाकारांना कराव्या लागतात. हेमंत ढोमे यानेही पाण्याच्या प्रश्नाविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

बिल्डिंगमधील पाण्याची समस्या, हक्काचे पाणी न मिळण्याबाबतची तक्रार, बिल्डर आणि महापालिकेच्या वादात भरडले जाणारे रहिवासी याबाबत एक खरमरीत पोस्ट हेमंतने टवीटरवर केली. ती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना टॅग केली. हेमंत ढोमेच्या या पोस्टने प्रशासनाची झोप उडाली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या बिल्डिंगमधल्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. हेमंत ढोमे यांनी पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, पाणी हा आमचा हक्क आहे. बिल्डर आणि महापालिका यांच्या वादात आम्ही भरडले जात आहोत. इमारतीचे ओसी, मालमत्ता कर भरूनही पाणी मिळत नाही. प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्या नागरिकांना जर पाणी मिळणार नसेल तर प्रशासनाचा काय उपयोग?
हेमंतच्या या टवीटरनंतर पालिका खडबडून जागी झाली आणि दुसऱ्याच दिवशी पाणी प्रश्न सुटला. यानंतर हेमंतने आभाराचीही पोस्ट केली. हेमंतच्या या सोशल मीडियाच्या उपयुक्त वापराचं कौतुक होत आहे. हेमंत मराठी चित्रपटसृष्टी, मालिका आणि नाटक या माध्यमात सक्रिय आहे. झिम्मा या सिनेमाच्या दिग्दर्शन हेमंतने केलं आहे. तर क्षणभर विश्रांती या सिनेमात त्याने अभिनय केला आहे. हेमंत उत्तम लेखकही आहे. तो सोशल मीडियावर सामाजिक प्रश्नांविषयी नेहमीच व्यक्त होत असतो. यापूर्वी त्याची सध्याच्या राजकीय व सामाजिक वातावरणावर आधारीत, हे जर असंच सुरू राहिलं तर देश महासत्ता नव्हे तर महाथट्टा होईल ही पोस्ट गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली या वादावर त्याने महात्मा फुले यांचा फोटो शेअर केला होता.