ओम राऊत दिग्दर्शित आदीपुरुष या आगामी बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वी लॉन्च झाले होते. त्यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास भगवान श्री रामाच्या भूमिकेत दिसला. तर अभिनेत्री क्रिती सेनन हिने सिता मातेची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. सनी सिंग हा कलाकार लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसला. तर मराठमोळा देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारणार. तसेच या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून अमिताभ बच्चन, तृप्ती तोरडमल, काजोल, वत्सल सेठ, सोनल चौहान आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
येत्या २६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र आज हनुमान जयंती निमित्त देवदत्त नागे यांचा हनुमानाच्या गेटअप मधला एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून लोक हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. देवदत्त नागे या भूमिकेसाठी अगदी चपखल बसला आहे असे मत प्रेक्षकांकडून मिळत आहे. त्याची ही भूमिका पाहून देवदत्तच्या मावशीने त्याच्यासाठी एक खास गोष्ट लिहिली आहे. हा माझा भाचा आहे अशी ओळख करून देत अभिनेत्री वीणा जामकर हिने त्याच्या या सर्व मेहनतीचं चीज झालं असं म्हटलं आहे. वीणा जामकर ही देवदत्त नागेची मावशी आहे. आपल्या भाच्याच्या कौतुकाचे गुण गाताना वीणा जामकर म्हणतात की, आज मला एक बात सांगायची आहे.
हा हनुमान, ऍक्टर देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी. पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते, जय मल्हार च्या सेटवर. कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही. अतिशय मेहनत, जिद्द आणि त्याच्या शरीरयष्टी सारखीच बलदंड इच्छाशक्ती. ह्यांच्या जोरावर देवदत्त यशाची शिखरं चढतो आहे आणि चढतच राहिल. त्याचा खूप अभिमान वाटतो तो फक्त ऍक्टर म्हणून नाही तर एक अतिशय नम्र, हुशार असा कुटुंबातला एक सदस्य म्हणून सुद्धा! मी एकतरी मालिका करावी म्हणून मला सतत motivate करत राहिला आणि तिथेच न थांबता आता तो माझा mentor आहे! मला काहीही अडचण आली की ‘देवा’ माझ्या मदतीला हजर असतो.
माझा इतका छान भाचा मला माझ्या लहानपणीच भेटायला हवा होता. म्हणजे लुटूपुटूची ‘मावशी भाच्याची’ जोडी गणपतीत खूप खेळली असती. असो, आज सकाळी हनुमान जयंतीच्या इतक्या सुंदर, अद्भुत शुभेच्छा मिळाल्या. काय अप्रतिम पोस्टर आहे! अजून कोण बनू शकला असता ‘हनुमान’? बालम, त्याचं घरातलं नाव. We are so so proud of you! तुझ्या जिद्दीला सलाम, तुझी सगळी सगळी स्वप्न पूर्ण होवोत अशी मन:पूर्वक प्रार्थना. आदिपुरुष साठी खूप साऱ्या शुभेच्छा.