लागीरं झालं जी या मालिकेतून शितलीच्या भूमिकेने शिवानी बावकरला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर शिवानी आणखी काही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आता शिवानी गावरान बाज असलेली भूमिका साकारताना दिसणार आहे. आज ६ मे रोजी शिवानी बावकर अभिनित ‘गुल्हर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटाची टीम फारच उत्सुक आहे. गुल्हर चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश चौधरी यांनी केले आहे. या चित्रपटात तो शिवानी बावकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. गुल्हर ही ग्रामीण भागातील एका उनाड मुलाची गोष्ट आहे. ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे बालकलाकार विनायक पोतदार याने.

भार्गवी चिरमुले, रवी काळे, माधव अभ्यंकर, किशोर चौघुले, पुष्पा चौधरी, सुरेश विश्वकर्मा अशा कसलेल्या कलाकारांची साथ त्यांना लाभली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अजय गोगावले यांनी स्वरबद्ध केलेली ‘आभाळानं पंख हे पसरलं’ आणि ‘लहर आली लहर आली’ ही गाणी तुफान लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाची आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे. गुल्हरची कथा मोहन पडवळ यांची आहे. चित्रपटात ग्रामीण बाज असावा म्हणून कुठलाही आर्टिफिशिअल मेकअप न करता कलाकारांना रिअल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गुल्हर हा एक उनाड आणि तितकाच खट्याळ मुलगा आहे मात्र त्याच्या आयुष्यात एक घटना घडते. ज्यामुळे चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

हा चित्रपट अवघ्या २२ दिवसात शूट करण्यात आला आहे. याचे श्रेय चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकाला द्यावे लागेल. चित्रपट संपल्यावर यातून समाजाला एक आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे. या चित्रपटा अगोदर रमेश चौधरीने बाबो चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच महत्वाची भूमिका साकारली होती. गुल्हर चित्रपटाचे कथानक आवडल्याने दिग्दर्शन तसेच शिवानी सोबत महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. सामाजिक संदेश देणारा चित्रपट असल्याने चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांची निराशा होणार नाही हे तो खात्रीपूर्वक सांगतो. आज ६ मे रोजी गुल्हर चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षकांची पसंती नक्की मिळणार असा विश्वास आहे. या यशस्वी प्रवासासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.