बीआर चोप्रा यांची महाभारत ही हिंदी मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुंफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृती बाबत मैत्रिण आणि अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावरून अपडेट दिली आहे. सोबतच गुफी पेंटल यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. गुफी पेंटल यांचे खरे नाव सरबजीत सिंग पेंटल असे आहे. लहानपणापासून अभिनयाकडे त्यांचा ओढा होता, भाऊ कंवरजीतसोबत लहानपणी ते नाटकातून काम करायचे.
आपल्या मुलाने अभियंता व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर बिहारमधील जमशेदपूर येथील टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह फर्ममध्ये त्यांनी काम केले होते. चीन युद्धामुळे संरक्षण आणीबाणीच्या काळात गुफी पेंटल सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर मुंबईतील टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह शाखेत त्यांची बदली करण्यात आली. इथूनच अभिनयाचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. १९७८ सालच्या दिल्लगी चित्रपटातून त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. याच काळात त्यांनी बॉलिवूड चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाचा जम बसवला होता. महाभारत मालिकेतील शकुनीमामाच्या भूमिकेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.
सध्या त्यांचे वय ७८ असून प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. ३१ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण कुटुंबाने त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती देण्याचे टाळले आहे. महाभारतातील शकुनी मामा म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर सुहाग आणि मैदान ए जंगसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच अनेक टीव्ही मालिकांचाही ते महत्वाचा भाग बनले होते. शरीर अस्वास्थ्यामुळे काही काळापासून ते अभिनय क्षेत्रापासून बाजूला आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली जात आहे.