दूरदर्शनवरील ९० च्या दशकातील ‘गोट्या’ ही मालिका बहुतेकांना आजही चांगली आठवत असेल. या मालिकेत जॉय घाणेकर याने गोट्याची भूमिका निभावली होती. तर मानसी मागिकर यांनी माईंची भूमिका साकारली होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या मानसी मागिकर नेहाच्या काकूंची भूमिका साकारत आहेत. ‘का रे दुरावा’, ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतूनही त्या महत्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. मानसी मागिकर या पूर्वाश्रमीच्या ‘विनया तांबे’. उत्तम गायिका आणि नाट्य अभिनेत्री म्हणून त्यांनी सुरुवातीला कलाक्षेत्रात नाव कमावले होते. बालनाट्य, एकांकिका, नाट्य स्पर्धा साकारत असताना व्यावसायिक नाटकातून त्या पुढे आल्या.
पुढचं पाऊल या चित्रपटात ‘एकाच या जन्मी जणू’ या गाण्यामुळे मानसी मागिकर खूप लोकप्रिय झाल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनीच मानसी मागिकर यांना गोट्या मालिकेत माईंची भूमिका देऊ केली. या मालिकेच्या काही खास आठवणी सांगताना मानसी मागिकर म्हणतात की मालिकेचे शूटिंग मढला झाले होते. सुतारवाडीच्या कोपऱ्यावर एक जुनी बिल्डिंग होती, तिथे कोकणाची वाडी वाटावी असच वातावरण दिसत होतं. गोट्या हा अनाथ मुलगा होता त्याचे काका काकू त्याला खूप छळत असतात. माई त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवतात. ही मालिका आठवड्यात एकदाच टीव्हीवर दिसायची. मालिका १३ भागांच्या पटीत वाढवून मिळायची असे मागिकर म्हणतात.
प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून २६ भागापर्यंत मालिका वाढवली. त्यानंतर पुन्हा ३९ भाग वाढवण्यात आले. मात्र ३३ व्या एपिसोडला राजदत्त यांनी सांगितलं की ‘आता आणखी पाणी घालणं शक्य नाही’. आताच्या मालिका पाहिल्यानंतर वाटतं की आताचे प्रोड्युसर आज असं उत्तर देतील का? पण राजदत्त यांची कामाप्रती एक निष्ठा होती. मालिकेच्या कथेची मर्यादा माहीत असल्याने उगीचच काहीतरी दाखवायचं हे त्यांना मान्य नव्हते. ही गोष्ट शक्य असली तरीही त्यांनी ते वाढवून नाही दाखवलं. मालिकेच्या कथेतून जेवढा आशय प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायचा होता तो पोहोचला होता. तेव्हा आपण आता इथेच थांबलं पाहिजे ही जाणीव त्यांना झाली होती.
त्यामुळे मालिका वाढवणे शक्य असूनही त्यांनी ते प्रकर्षाने टाळले होते. मानसी मागिकर यांनी सुलेखा तळवळकर यांच्या युट्युब चॅनलवर एक मुलाखत दिली आहे. आपल्या या अभिनय क्षेत्राच्या प्रवासात गोट्या मालिकेच्या काही खास आठवणी त्यांनी यावेळी शेअर केल्या आहेत. मालिकेचे शोर्षक गीत असो वा मालिकेचे कथानक आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे त्या संदर्भात असलेल्या काही खास आठवणी प्रेक्षकांना देखील निश्चितच आनंद मिळवून देतात.