जय संतोषी माँ या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या, प्रसिद्ध अभिनेत्री बेला बोस यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. नृत्यांगना म्हणून बेला बोस यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर चित्रपटाची प्रमुख नायिका ,सहाय्यक अशा भूमिका त्यांनी वठवलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. १८ एप्रिल १९४२ रोजी बेला बोस यांचा कलकत्ता येथे जन्म झाला. त्यांचे वडील अमूल्य रतन बोस कपड्यांचा व्यवसाय करत होते. पुढे हे बोस कुटुंब मुंबईला आहे. मात्र इथे आल्यावर बेलाच्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले. बेलाच्या आई गृहिणी असल्या तरी नवऱ्याच्या निधनानंतर खंबीर झाल्या.
नर्सिंगचा कोर्स करून पाच मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी संभाळली. अशातच शालेय शिक्षणानंतर आईला हातभार लागावा म्हणून बेला चित्रपटातील ग्रुप डान्स मधून काम करत असत. मात्र डान्सचे टीचर त्यांना कामाचे पैसे देत नसत. म्हणून मग त्या स्वतःच चित्रपटाच्या सेटवर जाऊन ग्रुप डान्समध्ये सहभागी होऊ लागल्या. मात्र शरीराने उंच आणि किरकोळ शरीरयष्टी पाहून तिला ग्रुप मधून बाजूला काढले जायचे. बाकीच्या मुली देखण्या दिसायच्या त्यात आपण असे किरकोळ असल्याने सगळ्यांची नजर त्यांच्यावर पडत असे आणि म्हणूनच त्यांना अनेकदा ग्रुपमधून बाजूला केले जायचे. एकदिवस ग्रुपमध्ये असताना नरेश सेहगल यांची नजर त्यांच्या डान्सवर पडली. आणि लगेचच सोलो डान्स करण्याची ऑफर देऊ केली.
१९५८ साली मै नशे में हूँ चित्रपटात बेलाला सोलो डान्स सादर करण्याची संधी मिळाली. शिकार, पूनम की रात अशा अनेक चित्रपटातून त्यांनी नृत्याचे सादरीकरण केले. अशातच नागीन और सापेरा चित्रपटात अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा झळकण्याची संधी मिळाली. मुख्य, सहाय्यक भूमिकांमुळे बेला बोस हे नाव चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले. १९६७ साली निर्माते, लेखक, अभिनेते आशिष कुमार सेन गुप्ता सोबत त्यांनी प्रेमविवाह केला. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलगी मंजुश्री आणि मुलगा अमितच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळली. मंजुश्रीला त्यांनी डॉक्टर बनवले तर मुलगा फायनान्स कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. बेला बोस अभिनय क्षेत्रातून बाजूला होऊन आपल्या नातवंडासोबत वेळ घालवू लागल्या. आज मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.