देवमाणूस २ या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या पर्वातील पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलीच स्मरणात आहेत. मालिकेच्या पहिल्या पर्वात विजय रावांचे पात्र अभिनेता एकनाथ उद्धवराव गीते याने साकारले होते. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचं मूळ गाव. एकनाथला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात तो नेहमी सहभागी व्हायचा. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर ऑफ थिएटर्स आर्ट्स केलं. यातून अनेक नाटकात त्याला काम करण्याची संधी मिळाली.
देवमाणूस या मालिकेअगोदर कलर्स मराठीवरील जागते रहो महाराष्ट्र, मेरे साई हिंदी मालिका, तांडव मराठी चित्रपट, झी युवा वरील तू अशी जवळी रहा. स्टार प्रवाहवरील प्रेमा तुझा रंग कसा, श्री गुरुदेव दत्त, फक्त मराठी देव पावला, घेतला वसा टाकू नको अशा चित्रपट आणि अनेक मालिकांमधून एकनाथला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत काम करत असताना सहनायिकेसोबत त्याचे प्रेम जुळले. ही नायिका म्हणजेच त्रिशा कमलाकर. त्रिशा ही मॉडेल, अभिनेत्री आहे; तसेच तिने शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. तुझ्या माझ्या पिरमाचा बॅनर लागला, मैत्रीची दोस्ती, शिकायत अशा व्हिडिओ सॉंगमधून ती झळकली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटात देखील तिला अभिनयाची संधी मिळाली होती. स्टार प्रवाहवरील प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत तिने महत्वाची भूमिका निभावली होती. याच मालिकेत काम करत असताना या दोघांमध्ये प्रेम जुळून आले. एकनाथ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘गेट टुगेदर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा पहिला टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महत्वाचं म्हणजे चित्रपटात त्याची खऱ्या आयुष्यातील प्रेयसी म्हणजेच त्रिशा कमलाकर नायिकेची भूमिका साकारणार आहे. आपल्या पहिल्या मालिकेत देखील त्रिशा सोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली होती. एपिसोड मालिका आणि सिरीजमध्ये देखील एकनाथला साथ मिळाली ती त्रिशाचीच.
आपल्या आणखी एका प्रवासात तिची नायिका म्हणून साथ मिळाल्याने एकनाथ खूपच खुश झाला आहे. ‘लकी त्रिशा’ म्हणत त्याने तिचे आपल्या आयुष्यात येणे महत्वाचे मानले आहे. लहानपणापासून हिरो व्हायचं हे स्वप्न घेऊन तो मुंबईत दाखल झाला होता. मुंबईत आल्यावर त्याला नाटक, मालिकामधून विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. पण यातून मुख्य नायक बनायचं त्याचं स्वप्नं अपुरं होतं. आता हेच स्वप्न सत्यात उतरताना पाहून एकनाथ आणि त्रिशा दोघेही खूपच खुश झालेले पाहायला मिळत आहेत. त्रिशा कमलाकर आणि एकनाथ गीते यांना आगामी चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.