मराठी बिग बॉसच्या घरात गायत्री दातार कंटेस्टंट बनून गेली आहे. बिग बॉसने दिलेल्या सुरुवातीच्या एका टास्कमध्ये गायत्री दातार आणि जय दुधाने यांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली होती. तर नुकत्याच वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणाऱ्या आदीश वैद्यने बिग बॉसच्या कॉलेजमध्ये गायत्रीला हसवण्यास भाग पाडले. गायत्री बिग बॉसच्या सदस्यांमध्ये आता चांगलीच रुळली असली तरी तिच्या या घरात स्पर्धक बनून येण्याने तिच्या हातात असलेला एक प्रोजेक्ट मात्र पुरता निसटला आहे.
गायत्री दातार बिग बॉसच्या घरात येण्याअगोदर “बाबू” हा आगामी मराठी चित्रपट साकारणार होती. श्री कृपा प्रोडक्शनच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मयूर शिंदे यांनी सांभाळली असून अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकित मोहन सोबत अभिनेत्री गायत्री दातार आणि रुचिरा जाधव झळकणार होत्या मात्र गायत्री बिग बॉसच्या घरात असल्याने ती ह्या चित्रपटाचे शूटिंग करू शकत नाही. त्यामुळे बाबू चित्रपटात गायत्रीच्या जागी आता अभिनेत्री नेहा महाजन हिची वर्णी लागली आहे. २०१७ साली तुझं तू माझं मी या मराठी चित्रपटात काम केल्यानंतर नेहा महाजन हिंदी चित्रपटात दिसली होती त्यानंतर आता तिची बाबू चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. बाबू या आगामी चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे या चित्रपटाचे नाव जाहीर झाले त्यावेळी गायत्री दातार, अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी हजेरी लावली होती.
मात्र आता ह्या चित्रपटात गायत्री ऐवजी नेहा महाजन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. आणि म्हणूनच गायत्रीच्या हातातून तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट निसटला असल्याचे सांगितले जाते. तुला पाहते रे या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून गायत्रीने मराठी मालिका सृष्टीत पाऊल टाकले होते. या मालिकेतून गायत्री मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली होती त्यानंतर गायत्री निम्मा शिम्मा राक्षस या नाटकात दिसली. काही काळ चला हवा येऊ द्या च्या मंचावर वरून तिने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर ती चित्रपट देखील साकारणार म्हणून तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता देखील होती. मात्र मराठी बिग बॉसच्या सिजन ३ मध्ये तिला बोलावण्यात आल्यामुळे तिने बाबू चित्रपट साकारण्यास नकार दिला आहे.