आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील. आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी तेवढीच खास ठरली आहे. गौतमी पाटील हिचे राज्यभर नृत्याचे कार्यक्रम होत असतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणांची गर्दी खेचलेली पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी अश्लील नृत्य सादर केल्याने गौतमी पाटीलला धारेवर धरण्यात आले होते. यातूनच तिला प्रसिद्धी मिळत गेली होती. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि मेघा घाडगे यांनी तिला झालेल्या प्रकाराबाबत माफी मागायला लावली होती.
पुन्हा असे कृत्य करणार नाही असे म्हणत तिने सगळ्यांची माफी देखील मागितली होती. मात्र या नंतर गौतमी आणखीनच प्रकाशझोतात आली आणि आता तर रोजच तिला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. तिला मिळत असलेला हाच प्रतिसाद पाहून गौतमीला चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. घुंगरू या आगामी चित्रपटातून गौतमी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे काम लवकरच पूर्ण होणार असून प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. कुंकू चित्रपटात लोककलावंतांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा असेही आवाहन तिने केले आहे. गौतमीचे राज्यभर होत असलेल्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र मी माझी कला सादर करते यात आता कुठल्याही प्रकारे मी अश्लीलपणा करत नाही. मागे झालेल्या चुकीबद्दल मी सर्वांची माफी मागितली होती. पण आता मी छान पध्दतीने कार्यक्रम करते जो लोकांना आवडत आहे. गौतमी पाटील मूळची धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा गावची. लहानपणीच आईला वडिलांनी सोडून दिले, त्यामुळे पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण सोडून तिने लावणीच्या कार्यक्रमात काम करण्यास सुरुवात केली. बॅक आर्टिस्ट पासून सुरुवात करत आता मुख्य आर्टिस्ट पर्यंत मजल मारत यश संपादन केले आहे. आता तर ती चक्क चित्रपटातून प्रमुख नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घुंगरू हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.