येत्या १७ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सलमान सोसायटी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनाथ मुलांची शिक्षणासाठीची ओढ या चित्रपटात दाखवली जाणार आहे. अनाथ मुलांचा हा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलेले आहे. तर रेखा सुरेंद्र जगताप, वैशाली सुरेश चव्हाण आणि शांताराम खंडू भोंडवे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
सलमान सोसायटी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. बालकलाकार देवकी भोंडवे हिने या चित्रपटातून महत्वाची भूमिका साकारली आहे, एक गाणेही तिने या चित्रपटासाठी गायले आहे. तर पुष्कर लोणारकर, शुभम मोरे, विनायक पोतदार या बच्चे कंपनीसह उपेंद्र लिमये, गौरव मोरे,वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, नरेंद्र केरेकर यांच्याही यात महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. सलमान सोसायटी या चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. त्यातील अभ्यासू किडा हे गाणं लोकप्रिय ठरेल असा विश्वास दिग्दर्शकाला आहे. उपेंद्र लिमये यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. तर पार्टी दणाणली हे आयटम सॉंग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
नंदना शर्मन आणि गौरव मोरे या गाण्यात झळकले आहेत. शिक्षणापासून वंचित राहोलेल्या अनाथ मुलांची ही कहाणी आहे. शिक्षणा साठीची ओढ तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ड्रामा, कॉमेडी आणि काही इमोशनल सिन आहेत जे पाहून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल असा विश्वास दिग्दर्शक कैलाश पवार यांना आहे. त्यामुळे गौरव मोरेचा चित्रपट म्हणून लोक या चित्रपटाची वाट पाहुन आहेत. १७ नोव्हेंबर रोजी सर्व महाराष्ट्रात १०० हुन अधिक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते शांताराम भोंडवे यांनी हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मोठी मेहनत घेतली आहे. मीडिया माध्यमांनी देखील या चित्रपटाची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल अशी त्यांना आशा आहे.