रविंद्र महाजनी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा गश्मीरने सुद्धा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. गश्मीरने घेतलेल्या मेहनतीचे यश त्याला मिळत गेले. अगदी मराठी चित्रपट सृष्टीचा नायक ते हिंदी चित्रपट मालिकेचा नायक अशी त्याने मजल मारलेली पाहायला मिळाली. मी स्मार्ट आहे पण वडीलांसारखा देखणा नाही असे तो एका मुलाखतीत म्हणाला होता. गश्मीरचा मुलगा देखील त्याच्यासारखाच दिसायला अतिशय देखणा आहे. २१ डिसेंबर २०१८ रोजी गश्मीर आणि गौरी महाजनी या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली होती.
साडेचार वर्षांचा त्याचा हा क्युट मुलगा सर्वांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या मुलाचं नाव आहे व्योम. व्योम या नावाचा अर्थ आहे आकाश. आपला मुलगा कसा मोठा होतोय या प्रत्येक गोष्टी गश्मीरला जवळून अनुभवायच्या आहेत. हे क्षण त्याला मुळीच मिस करायचे नाहीत असे तो एका मुलाखतीत म्हणाला होता. गश्मीर हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा म्हणून ओळखला जात असला तरी त्याने उत्तम नृत्याच्या आणि भारदस्त अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख बनवली आहे. गश्मीर आणि मुलगी रश्मी ही दोन अपत्ये रविंद्र महाजनी यांना आहेत. मात्र १४ जुलै रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यानंतर गश्मीर महाजनी हे नाव प्रकाशझोतात आलं. नुकताच त्यांचा अंतिम रिपोर्ट तपास यंत्रणेच्या हाती आला आहे.
या अहवालात रविंद्र महाजनी यांचे गुरुवारी १३ जुलै रोजी सकाळीच निधन झाले असल्याचे सांगितले आहे. तळेगाव दाभाडे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी ही माहिती दिली आहे. या सोबतच अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की रविंद्र महाजनी यांच्या शरीरावर कुठल्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान वडिलांना अखेरचा निरोप देताना गश्मीर खूपच भावुक झाला होता. ज्यावेळी वडिलांचे पार्थिव त्याने हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता. मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार मंडळी त्याच्यासोबत तिथे उपस्थित होते. तेव्हा त्यांनी गश्मीरला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी रविंद्र महाजनी यांच्या पत्नी, सून गौरी यांनी देखील उपस्थित होत्या.