मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक देखणा, तरुण उभरता चेहरा म्हणजे गश्मीर महाजनी. सध्या गश्मीर हिंदी रिऍलिटी शो झलक दिखला जा च्या दहाव्या सिजनमध्ये सहभागी होऊन त्याच्या नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. नुकताच गश्मीरने एक परफॉर्मन्स सादर केला ज्यात त्याच्या पूर्वायुष्याची झलक दाखवण्यात आली. कर्जात बुडालेल्या गश्मीरने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आपल्या कुटुंबाला सावरण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. हा क्षण जवळून अनुभवणाऱ्या गश्मीरच्या आईला मात्र त्याचा हा परफॉर्मन्स पाहून अश्रू अनावर झाले. झलक दिखला जा च्या मंचावर या आठवणी पुन्हा जाग्या झाल्याने महाजनी कुटुंब गहिवरून गेले.
‘हा नसता तर आम्ही नसतो.’ अशी भावुक प्रतिक्रिया गश्मीरच्या आईने यावेळी दिलेली पाहायला मिळाली. गश्मीर हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा. १९८५ साली मुंबईत त्याचा जन्म झाला. शनिवारचा जन्म असल्याने त्याचे नाव गश्मीर ठेवण्यात आले. गश्मीर हे वेगळे नाव ऐकून लोकांना अनेकदा आश्चर्य वाटते मात्र हे हनुमानाचे नाव आहे असे गश्मीर एका मुलाखतीत सांगतो. वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेतली होती. आईच्या नावावर असलेलं राहतं घर बँकेकडे गहाण ठेवलं होतं. त्यावर साधारण ४० ते ५० लाखांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठी गश्मीरने डान्स अकॅडमी सुरू केली होती. त्यानंतर दोन वर्षात कार्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. यातून मर्सिडीज सारख्या मोठमोठ्या कंपन्यांसाठी इव्हेंटस केले.
२१ व्या वर्षी म्हणजे अवघ्या ६ वर्षात त्याने ४० ते ५० लाखांचं कर्ज फेडलं होतं. तेव्हाच त्याला जाणीव झाली होती की आपल्याला चित्रपटात येण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे. गश्मीर जेव्हा दहावीत होता तेव्हाच त्याचं ठरलं होतं की आपण चित्रपटात काम करायचं. नाटक, एकांकिका, प्रायोगिक नाटक अशा विविध माध्यमातून तो रंगभूमीशी जोडला गेला. कॉलेजमध्ये मित्रांच्या मदतीने त्याने नाटकाचा ग्रुप तयार केला. गावोगावी जाऊन त्यांनी नाटक सादर केले. मग पृथ्वी थिएटरशी तो जोडला गेला. कॉलेजमध्ये असताना बऱ्याच मुलींशी त्याचं अफेअर जुळलं. मात्र लग्न करायची वेळ आली तेव्हा पहिलं नाव सुचलं ते गौरीचं. गौरी ही फॅमिली फ्रेंड होती. दोन ते तीन महिन्यातून एकदा फक्त चहा कॉफीसाठी ते दोघे एकमेकांना भेटत असत.
जिच्याशी कधीही डेट केली नाही जिच्यासोबत प्रेमाच्या गप्पा कधी मारल्या नाहीत तिच्यासोबत त्याने लग्न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य होता असे तो आवर्जून सांगतो. खरं तर या काळात गश्मीर खूपच डिप्रेशन मध्ये गेला होता. एका मराठी चित्रपटासाठी त्याने निर्माता म्हणून काम केले होते. मात्र हा चित्रपट रखडल्याने तो तणावाखाली वावरत होता. अशावेळी एक आधाराची त्याला खूप गरज होती, म्हणून आता आपल्याला लग्न करायचंय असा निर्णय घेताच त्याला गौरीचेच नाव सर्वात आधी सुचले होते. गश्मीरचा प्रवास खडतर असला तरी तो आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीने तितक्याच सहजतेने पार करताना दिसतो आहे.