दिवंगत अभिनेते गणपत पाटील यांच्या पत्नी प्रमिला गणपत पाटील यांचे शुक्रवारी १ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. प्रमिला पाटील कोल्हापूर येथे आपल्या मुला नातवंडासोबत वास्तव्यास होत्या. शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी प्रमिला पाटील यांना मावशी म्हणून हाक मारत असत. मायाळू आणि तितक्याच खंबीर अशा या मावशी गणपत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या.
गणपत पाटील मराठी सृष्टीत नाच्याच्या भूमिकेमुळे विशेष ओळखले जायचे. आता गं बया हा त्यांचा डायलॉग आठवला की गणपत पाटील हे नाव समोर येते. पण याच भूमिकेमुळे गणपत पाटील यांना समाजाने वाईट वागणूक दिली. अशा माणसांची लग्न कशी होतात, त्यांना मुलं कशी होतात अशी अवहेलना त्यांच्या वाट्याला आली होती. पण या बोचऱ्या वाटेवर पत्नी प्रमिला यांची त्यांना मोठी साथ मिळाली होती. नटरंग चित्रपटाने या भूमिकेला एक मानाचे स्थान मिळवून दिले होते मात्र हा मानसन्मान पाहायला ते जिवंत नव्हते. खरं तर गणपत पाटील यांनी मराठी चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. मात्र नाच्याची भूमिका त्यांच्या आयुष्याला अशी चिकटली होती की मृत्युनंतरही त्यांना याच भूमिकेसाठी ओळखले जाऊ लागले.
अशा खडतर प्रवासात प्रमिला पाटील यांनी त्यांचा संसाराचा गाडा सुरळीत चालू ठेवला होता. मुला मुलींची लग्न जमवताना समाजाकडून त्यांना वाईट वागणूक मिळाली होती. मनातला हा हळवा कोपरा गणपत पाटील यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीतून उलगडला होता. तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांचे हे दुःख पाहून निवेदक देखील हळवे झाले होते. एवढं सगळं दुःख सोसूनही प्रमिला पाटील यांच्या चेहऱ्यावर मात्र कायम हसू असे. त्यांच्या निधनाच्या बातमीने जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रमिला गणपत पाटील यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.