जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची धमक असली की असाध्य गोष्टी साध्य करता येतात. असाच काहीसा प्रकार लावणी कलावंत असलेल्या सुरेखाच्या बाबतीत घडला आहे. लावणीला सांस्कृतिक क्षेत्रात मोठं नाव असलं प्रसिद्धी असली तरी त्यात काम करणाऱ्या कलाकारांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. पीएसआय अधिकारी बनलेल्या सुरेखा खोले यांना देखील सुरुवातीला ही अवहेलना सोसावी लागली होती. सुरेखा कोरडे खोले यांचे बालपण अतिशय खडतर प्रवासातून गेले आहे. लहान असल्यापासूनच त्यांना नृत्याची विशेष आवड होती. सुरेखाचे वडील पीएमटी मध्ये ड्रायव्हर आणि आई घरकाम करायची त्यामुळे घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती.
नववी इयत्तेत शिकत असताना कराटेच्या निमित्ताने सुरेखाला काठमांडूला जायचे होते. त्यासाठी लावणारे ७ ते ८ हजार कुठून आणायचे हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. एका डान्सच्या कॉम्पिटिशनमध्ये तिने सहभाग घेण्याचे ठरवले. मात्र वडील नकार देतील म्हणून तिने ते त्यांच्यापासून लपवून ठेवले. या स्पर्धेत सुरेखाने पहिला नंबर पटकावला आणि १३ हजारांचे बक्षीस मिळाले. ही गोष्ट तिने घरी सांगितली तेव्हा वडिलांनी शिक्षण पूर्ण करायचं या अटीवर काठमांडूला जाण्याची परवानगी दिली. पण सुरेखा लावणीवर डान्स करतीये म्हटल्यावर नातेवाईकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तमाशात काम करतीये असे म्हणून सगळे जण हिनवु लागले. लोक आपल्याला नावं ठेवतायेत हे सुरेखाच्या जिव्हारी लागले, त्यानंतर तिने एमपीएससीची तयारी केली.
अर्थात हा अभ्यासाचा भार तिच्यासाठी कठीण होता कारण दहावीला तिने केवळ ४५ टक्के गुण मिळवले होते. यादरम्यान सुरेखा राज्यभर लावणीचे दौरे करत वेळ काढून एमपीएससीची तयारी करत असे. पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरेखाच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. सुरेखा भिनयाची आवड जोपासत एक चित्रपट व वीस अल्बममध्ये झळकली. कलाक्षेत्रातील कामगिरीबद्दल सुरेखाला गदिमा पुरस्कार आणि राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. लावणी करायला मला अजूनही आवडते मात्र त्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे सुरेखाला वाटते. सुरेखा म्हणते की आजकाल लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य सादर करणाऱ्या मुलींनी लावणीचा आदर केला पाहिजे. आपले शिक्षण करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घडवला पाहिजे.