झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन शो दाखल होत आहे. येत्या ३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फु बाई फु हा नवीन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैदेही परशुरामी या शोचे सूत्रसंचालन करणार असून सागर कारंडे आणि प्रणव राव राणे या शोमध्ये धमाल उडवताना दिसणार आहेत. उमेश कामत आणि निर्मिती सावंत या शोमध्ये परिक्षकाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. तसं पाहिलं तर झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी सर्व जुन्या मालिकांना राम राम ठोकला आहे. त्याजागी नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत.
बस बाई बस हा रिऍलिटी शो देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला, मात्र आता या रिऍलिटी शोची निरोप घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सुबोध भावे सध्या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने त्याला हा शो अर्धवट सोडावा लागत आहे. फु बाई फु या रिऍलिटी शोचा प्रवास २०१० साली सुरू झाला. पहिल्या पर्वात विशाखा सुभेदार आणि वैभव मांगले या जोडीने विजेतेपद पटकावले होते. या शोमधून अनेक कलाकारांना प्रेक्षकांना हसवण्याची संधी मिळाली होती. या शोचे सूत्रसंचालन निलेश साबळेकडे देण्यात आले होते.
भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, सुप्रिया पाठारे, क्षिती जोग, आनंद इंगळे, सतीश तारे प्रमुख भूमिकेत. सोबत अश्विनी एकबोटे, गिरीश ओक, अतुल तोडणकर, किशोरी अंबिये या सर्वांनी ही हसवण्याची जबाबदारी पार पाडली होती. आता लवकरच सुरू होणाऱ्या दहाव्या पर्वात वैदेही परशुरामी सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. निलेश साबळे सध्या चला हवा येऊ द्या या शोमध्ये लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध भूमिकेतून धुरा समर्थपणे सांभाळत आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत बऱ्याच प्रतीक्षेनंतर परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दहाव्या पर्वात कोण कोणत्या सेलिब्रिटींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे हे येत्या काही दिवसातच समोर येईल.