सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. कोणत्याही प्रकारची माहिती, बातमी, व्यावसायिक जाहिरात, फोटो किंवा व्हिडीओ काही क्षणांत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची अद्भूत क्षमता असणारं हे सर्वांत सशक्त माध्यम ठरत आहे. याच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रात्री रस्त्यावरून धावणारा हा १९ वर्षांचा मुलगा व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एका फिल्ममेकरने शूट केला आहे आणि या व्हिडिओतून सत्य समजताच अनेकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे. या मुलाची कहाणी ऐकून अनेकांनी त्याच्या या कृत्याचं मोठं कौतुक करत हा व्हिडीओ जोरदार व्हायरल केला आहे.
फिल्ममेकर विनोद कापरी उत्तरप्रदेशच्या नोएडा शहरातून रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आपल्या गाडीने प्रवास करत होते. प्रवासात त्यांना याच रस्त्यावर एक मुलगा जोरात धावताना दिसला. पाठीमागे बॅग लटकवून हा मुलगा का धावतोय? तो कुठल्या संकटात तर नाही ना म्हणून विनोद कापरी यांनी आपली गाडी त्याच्या जवळून नेली. आणि त्याला त्याच्या घरी जाण्यासाठी लिफ्ट ऑफर केली. परंतु या मुलाने गाडीत बसण्यास चक्क नकार दिला आणि धावतच विनोद कापरी यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागला. या मुलाचे नाव प्रदीप मेहरा उत्तराखंड अलमोरा इथला तो रहिवासी आहे. आई दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. एक मोठा भाऊ आहे तो देखील कामाला जातो. प्रश्नांना उत्तरं देत असताना प्रदीप म्हणतो की मी आता कामावरून आलोय, मॅकडोनाल्ड सेक्टर १६ येथे मी काम करतो.
तुम्ही मला गाडीतून घरी सोडवलं तर मला धावायला वेळ मिळणार नाही. मला आर्मीमध्ये भरती व्हायचंय सकाळी धावायला वेळ मिळत नाही. सकाळी उठून स्वयंपाक करायचा आणि कामाला जायचं असतं. मी माझ्या भावासोबत राहतो. तो आता कामावरून येईल मला घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे. या उत्तरावर प्रदीप कापरी यांनी त्याला व्हिडीओ व्हायरल होईल असे म्हटले. त्यावर प्रदीप हसत म्हणतो की व्हिडीओ व्हायरल झाला तर मी चुकीचं काम थोडी करतोय? त्याच्या या उत्तरावर केवळ कमाल हाच शब्द ओठावर येतो. मी रोज १० किलोमीटर धावतो सेक्टर १६ ते बरोला. या उत्तरानंतर विनोद कापरी यांनी प्रदीपला आपल्या घरी जाऊन जेवणाची ऑफर दिली.
मात्र प्रदीप यावर म्हणतो की माझा भाऊ उपाशी राहिल, भाऊ आता नाईट ड्युटीला गेलाय. हे माझं रोजचं रुटीन आहे. १९ व्या वर्षाच्या या प्रदीपच्या उत्तराने नेटकऱ्यांच्या मनात आदर निर्माण केला आहे. त्याची काम करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून सर्वच स्तरातून प्रदीपचं कौतुक केलं जात आहे. विनोद कापरा यांनी मोबाईलमध्ये शूट केलेला हा व्हडिओ सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवून गेला आहे. प्रदीप तुझ्या जिद्दीला सलाम आणि तुझी ईच्छा लवकरच पूर्ण होवो अशीच सदिच्छा नेटकाऱ्यांकडून त्याला मिळताना दिसत आहे.