महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला हा सुपरहिट चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, वंदना गुप्ते, अभिराम भडकमकर, नीलम शिर्के, अमेय हुनसवाडकर हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसले. या चित्रपटातील श्रेयस तळपदेने रवीची भूमिका साकारली होती तर त्याची नायिका म्हणजेच अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने मानिषाची भूमिका निभावली होती. रवी आणि मानिषाचे लग्न व्हावे म्हणून रवीचे मित्र खूप प्रयत्न करत असतात, पण ईनामदारांचा मुलगा बाब्या तिच्यासोबत लग्न करण्यास उत्सुक असतो.
पछाडलेला हा हॉरर चित्रपट मराठी प्रेक्षकांना खूप भावला. इनामदारांच्या वाड्यातून हे सर्व कशी सुटका करून घेतात, याचा थरार चित्रपटात पाहायला मिळाला होता. पछाडलेला या चित्रपटामुळे अश्विनीला प्रसिद्धी मिळाली होती पण या चित्रपटानंतर ती फारशी कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाली नाही. या मधल्या काळात तिने लग्न करून घर संसार संभाळण्याला प्राधान्य दिले होते. हा तिने अभिनित केलेला पहिला चित्रपट होता. पुण्यातील सौ विमलाबाई गरवारे हायस्कुल तसेच सिम्बॉयसिस कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले. यासोबतच तिने भरतनाट्यमचे देखील धडे गिरवले आहेत. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून ती नेहमी सहभाग घ्यायची. इथूनच नाटकांमधून तिला अभिनयाची संधी मिळत गेली. या चित्रपटानंतर २००८ साली ‘भावाची लक्ष्मी’ या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली.
यात तिने मिलिंद गवळी यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर २०१३ साली ‘गोविंदा’ चित्रपटात स्वप्नील जोशी सोबत तसेच २०१८ साली प्रेमाचा प्रतिबिंब आणि व्हाट्सअप लग्न तसेच फत्तेशिकस्त या बहुचर्चित चित्रपटात अदिलशहाची बडी बेगम अशा महत्वाच्या भूमिका साकारताना पाहायला मिळाली. येत्या काही दिवसात अश्विनी तब्बल दोन मराठी चित्रपटात झळकणार आहे. महेश मांजरेकर यांनी ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात तसेच ‘८ दोन ७५’ या आगामी चित्रपटात अश्विनी कुलकर्णी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे यांचा मुख्य भूमिका असलेला रोम्यांटिक सस्पेन्स चित्रपट आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेत्री अश्विनीला मनपूर्वक शुभेच्छा!