असे खूप कमी कलाकार मंडळी आहेत जे स्वतःच्या प्रसिद्धीशिवाय दुसऱ्याला प्रसिद्धी कशी मिळेल याकडे लक्ष्य देतात. ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि पेशाने शिक्षिका असलेल्या विद्या पटवर्धन या त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील. कलाकार घडवण्यावर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले त्या विद्या पटवर्धन गेल्या काही वर्षांपासून आजारामुळे एका जागेवर खिळून बसून आहेत. विद्या पटवर्धन या बालमोहन शाळेत शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळत असत. एवढेच नाही तर आपल्या मिळालेल्या पगारातून त्या मुलांना खाऊ वाटप करत असत. या शाळेत शिकणारी बरीचशी मुले आता मराठी सृष्टीत नामवंत कलाकार बनलेले आहेत.
प्रिया बापट, सचिन खेडेकर, मेघना एरंडे, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, स्पृहा जोशी अशा नामवंत कलाकारांना घडवण्यामागे विद्याताईंचाच हात आहे असे म्हटले तर वावगे ठरायला नको. विद्या पटवर्धन यांचे वडील पटवर्धन क्लासेस चालवत असत. विद्याताई शाळेत असतानाच नाटकातून सहभाग दर्शवत, सुलभा देशपांडे यांच्याकडे त्या बालनाट्यातून काम करत. जे जे स्कुल ऑफ आर्टसमधून कलेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बालमोहन विद्यामंदिर येथे चित्रकलेच्या शिक्षिकेची नोकरी केली. अभिनयाची आवड तर लहानपणापासूनच होती, त्यामुळे शाळेतील मुलांत त्यांनी अभिनयाची गोडी निर्माण केली. निवृत्ती स्वीकारल्या नंतरही त्यांनी अभिनय क्षेत्रात भरीव योगदान दिले. विनोदी भूमिका असो वा गंभीर, विद्याताईंनी तितक्याच नेटाने निभावल्या.
बाळाचे बाप ब्रह्मचारी, चिकट नवरा, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, अगं बाई अरेच्चा, भिकारी अशा चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या. प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातील त्यांनी साकारलेली अंबु लक्षवेधी ठरली होती. अखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र विद्याताई गेल्या सहा वर्षांपासून गंभीर आजाराला तोंड देत आहेत. या आजारामुळे त्यांना चालता देखील येत नाही. दादर येथे त्या वास्तव्यास असताना आर्थिक अडचणींमुळे त्यांचे हाल होत आहेत अशी चर्चा झाली. त्यावेळी बालमोहन शाळेचे विद्यार्थी, नामवंत कलाकार आणि शिक्षक मंडळी मदतीला सरसावली. विद्याताई आता एका जागेवर बसून आहेत, त्यांना आता बोलताही येत नाही. खाणाखुणा करून त्या आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतात.