आज ११ जानेवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेखा कामत यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत शोककळा पसरली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मालिका चित्रपटात काम करणे बंद केले होते. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. याच चित्रपटात त्यांची बहीण चित्रा नवाथे या देखील एकत्रित झळकल्या होत्या. लाखाची गोष्ट मधील अप्रतिम अभिनयाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.
रेखा कामत यांचे पूर्वाश्रमीचे नाव आहे कुमुद सुखटणकर. अगं बाई अरेच्चा!, कुबेराचं धन, गृहदेवता, लाखाची गोष्ट, ऋणानुबंध, संगीत एकच प्याला, कल्पवृक्ष कन्येसाठी (पहिले नाटक), गंध निशिगंधाचा (शेवटचे नाटक), गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, दिल्या घरी तू सुखी राहा दिवा जळू दे सारी रात, संगीत पुण्यप्रभाव, प्रेमाच्या गावा जावे, संगीत भावबंधन, मला काही सांगायचं आहे, लग्नाची बेडी अशा नाटक आणि चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकेत त्यांनी साकारलेली आज्जी खूपच लोकप्रिय झाली होती. सालस व्यक्तिरेखांचा चढता आलेख त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला.
चित्रपट लेखक ग रा कामत यांच्याशी अभिनेत्री रेखा कामात वयाच्या १९ व्या वर्षी विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर त्या पुण्यात वास्तव्यास होत्या. चित्रपट, नाटक, मालिका अशा जवळपास सहा दशकाहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. वयोपरत्वे प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारली होती. जेष्ठ कलाकार रेखा कामात यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून गेल्या आहेत. रेखा कामत यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला आमच्या कलाकार इन्फोच्या समूहाकडून मनापासून सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.