मराठी सृष्टीला आजवर अनेक दर्जेदार कलाकार लाभले. मुख्य भूमिके ईतकेच सहाय्यक भूमिकांमुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यातीलच एक म्हणजे अभिनेते, लेखक आणि शिक्षक अशा विविधांगी भूमिका निभावणारे अभिनेते दीनानाथ टाकळकर होय. दीनानाथ टाकळकर यांनी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे चित्रपटातून त्यांनी कधी काका, कधी शिक्षक तर कधी विनोदी तसेच गंभीर भूमिका देखील निभावल्या. दादा कोंडके यांच्या बहुतेक चित्रपटातून टाकळकरांना भूमिका ठरलेल्या असायच्या. मुका घ्या मुका, पळवा पळवी, आली अंगावर, खोल दे मेरी जुबान, येऊ का घरात या दादा कोंडके यांच्या चित्रपटातून त्यांनी काम केले होते.
पंढरीची वारी, गोंधळात गोंधळ, नवरा माझा ब्रह्मचारी, खिचडी, मर्दानी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटाचा ते एक महत्वाचा भाग बनले होते. खरं तर दीनानाथ टाकळकर हे पेशाने शिक्षक होते. पुण्यातील बाजीराव रोडवरील पुना इंग्लिश स्कुल मध्ये इंग्रजी विषय शिकवायला होते. शिक्षकी पेशा सांभाळत असताना ते नाटक चित्रपटातून सहभाग दर्शवत. ७० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपट, नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान मुलांचा अभ्यास बुडू नये यासाठी ते प्रयत्नशील राहत असत. नाटक, चित्रपटासाठी जरी बाहेरगावी जात असत तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते आपला अभ्यासक्रम पूर्ण करत होते. आचार्य, वाटा पळवाटा, दिवसेंदिवस अशा नाटकांमधून ते रंगभूमीवर सहज वावरले होते.
दीनानाथ टाकळकर यांची मध्यवर्ती भूमिका असलेली आधार ही हिंदी मालिका खूप गाजली होती. १९९० च्या दरम्यान दूरदर्शन वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जात होती. निवृत्ती नंतरचे एकाकी आयुष्य कसे असते हे त्यांनी आपल्या भूमिकेतून दाखवून दिले होते. दीनानाथ टाकळकर यांनी विविध ढंगी कलाकाराच्या भूमिका रंगवल्या. खऱ्या आयुष्यात सुद्धा ते तेवढेच विनोदी होते. आपल्या हसऱ्या आणि दिलखुलास स्वभावामुळे ते विद्यार्थी वर्गात खूपच लोकप्रिय ठरले होते. दादा कोंडके यांच्या चित्रपटात सुद्धा ते अशाच धाटणीच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. विविधांगी भूमिकेमुळे दीनानाथ टाकळकर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि कायम राहतील हेही तेवढेच खरे.