बऱ्याच प्रतीक्षेनंतर डॉ दिलीप घारे सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांची भूमिका ते निभावत आहेत. खरं तर दिलीप घारे यांनीच मकरंद अनासपुरे यांना अभिनयाचे धडे दिले होते. त्यामुळे अभिनयातली ही गुरू शिष्याची जोडी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. डॉ दिलिप घारे यांनी आजवर अनेक कलाकारांना घडवलं आहे. नाट्य शास्त्राचे विद्यापीठ अशी ओळख त्यांना देण्यात आली आहे.
दिलीप घारे हे मूळचे औरंगाबादचे. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई अशा मराठवाड्यातील कलाकारांना घडवण्यामागे त्यांचा हात आहे. गाजराची पुंगी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, महाराष्ट्राची हास्यजत्रा, हे मन बावरे या मालिका, चित्रपट आणि नाटकातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. अभिनयासोबतच गाण्याची त्यांना विशेष आवड आहे. त्यामुळे या मधल्या काळात दिलीप घारे यांनी गायनाकडे लक्ष्य केंद्रीत केले. एक छंद म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते गाणी सादर करताना दिसले. मन बावरे त्या नंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधुन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर आता मकरंद अनासपुरे या शिष्यासोबत पोस्ट ऑफिस उघडं आहे मधून पुन्हा एकदा अभिनय साकारताना दिसत आहेत.
मालिकेच्या सेटवर हे गुरुशिष्य जेव्हा एकत्रित येतात तेव्हा मात्र सेटवर धमाल उडालेली पाहायला मिळते. मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे दोघांकडून अनेक गमतीशीर किस्से सुद्धा या कलाकारांना ऐकायला मिळतात. त्यामुळे सेटवरच वातावरण हलकं फुलकं राहायला मदत मिळते. दिलीप घारे हे डॉक्टर असूनही अभिनय क्षेत्राच्या ओढीने ते रंगभूमीवर आले. त्यांच्या पत्नी सरोज घारे सुद्धा डॉक्टर आहेत, तर त्यांची मुलगी देखील डॉक्टर असून ती सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका हलका फुलका विनोद निर्माण करणारी आहे. हास्यजत्रा या शोमधील कलाकार मंडळी या मालिकेतून विनोदनिर्मिती करत प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. त्यात मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे यांना सुद्धा अभिनयाची संधी मिळाली आहे.