झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या शोमध्ये शेफ देवव्रत जातेगावकर झळकले होते. रुचकर पदार्थ बनवणे आणि ते तितक्याच आकर्षकतेने सजवणे ही त्यांची खासियत खवय्येच्या शोमध्ये पाहायला मिळाली होती. मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी शेफ अशी त्यांची ख्याती आहे. २०१२ साली जर्मनी मध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिक मध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. प्रसिद्ध कथालेखक आणि कादंबरीकार आनंद जातेगावकर यांचे ते सुपूत्र आहेत. तर देवव्रत यांची पत्नी केतकी अमरापूरकर या दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची मुलगी आहे. देवव्रत जातेगावकर हे सदाशिव अमरापूरकर यांचे जावई आहेत. सदाशिव अमरापूरकर हे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावचे.
नाटकातून काम करत असताना त्यांना चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. बॉलिवूड सृष्टीत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. आपल्या खलनायकी ढंगाच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांना धडकी भरवली होती. सडक, कदाचित, सख्खा भाऊ पक्का वैरी, गाव तसं चांगलं, होऊ दे जरासा उशीर, सबसे बडा खिलाडी, कुली नं १, याराना तसेच आग, जनता की अदालत, दूध का कर्ज, दुश्मन, ईश्क अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड सृष्टीतील बहुतेक सर्वच मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. ९० च्या दशकात चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा दरारा निर्माण केला होता. सदाशिव अमरापूरकर आणि सुनंदा अमरापूरकर यांना तीन मुली केतकी, सायली आणि रिमा.
त्यांची थोरली लेक केतकी यांनी देवव्रत सोबत लग्नगाठ बांधली. रिमा अमरापूरकर या अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर, डायरेक्टर आहेत. तर सायली जहागीरदार या साऊथ एशियन कल्चरल कॅन्सल्टंट आहेत. मार्च २०१४ रोजी सदाशिव अमरापूरकर यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यावेळी मराठीसह बॉलिवूड सृष्टीने हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. अभिनयाच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जोपासली. विविध सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते. मेधा पाटकर यांच्यासोबत नर्मदा आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते. सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्ट मार्फत गरजूंना आजही मदतीचा हात दिला जातो.