झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद पाहून या मालिकेचा सिकवल प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र डॉक्टरची कटकारस्थान काही केल्या थांबतच नव्हती एकेक सावज तो आपल्या जाळ्यात अडकवत होता आणि त्यांच्याकडून बक्कळ पैसा जमवून तो त्यांचा काटा काढत राहिला. आता सोनूच्या कुटुंबाला देखील त्याने उध्वस्त केले आहे. आणि सोनूच्या आईला सर्व गावकऱ्यांसमोर त्याने वेड्यात ठरवले आहे. त्यामुळे मालिकेचा प्रेक्षकवर्ग काहीसा नाराज झालेला पाहायला मिळाला. याच नाराज झालेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुश करण्यासाठी मालिकेत एका दमदार पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे.

या पात्राच्या येण्याने आता डॉक्टर देखील पुरता अडचणीत सापडणार असल्याची चिन्ह मालिकेत दिसून येत आहेत. मालिकेत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एन्ट्री होणार आहे. मिलिंद शिंदे यांनी आजवर अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तू तिथे मी, वादळवाट, अग्निहोत्र या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. मिलिंद शिंदे यांनी तू तिथे मी मालिकेत दादा होळकर हे पात्र साकारले होते. त्यांचे केवळ असणेच हे मालिकेत जीव ओतल्यासारखे आहे. त्यांनी केलेला तांबडे बाबांचा जप आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांना पाहिले की प्रेक्षकांच्या तोंडात त्यांचा हा डायलॉग आपसूकच येतो ही त्यांच्या अभिनयाची ताकद म्हणावी लागेल.

मिलिंद शिंदे देवमाणूस २ या मालिकेचा महत्वाचा भाग बनणार असल्याने मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड खुश झाला आहे. या मालिकेतून ते मार्तंड जामकर या पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे डॉक्टर त्यांच्या कचाट्यात नक्कीच सापडणार आणि त्याच्या कुरघोड्या उघड पडणार असा विश्वास प्रेक्षकांना वाटत आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये डॉक्टर एका सावजाला हेरताना पाहायला मिळाला. त्याच्याच पाठीमागे जामकर साहेब दबा धरून बसलेले पाहायला मिळाले. जांकरांच्या येण्यामुळे डॉक्टरची कटकारस्थानं उघड पडणार असल्याने तो पोलिसांपासून वाचण्यासाठी काय काय प्रयत्न करणार याची उत्सुकता आहे.
तूर्तास मिलिंद शिंदे यांच्या येण्याने मालिकेत प्राण आला आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. मिलिंद शिंदे यांचा अभिनय क्षेत्रातला अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे. दोन दशकाहून अधिक काळ ते या सृष्टीत वावरत असले तरी ते स्वतःला अभिनेते म्हणवून घेत नाहीत. कारण येणाऱ्या प्रत्येक भूमिकेतून काहीतरी शिकायला मिळते. त्यामुळे मी अजूनही शिकतच आहे असे त्यांचे म्हणणे असते. मिलिंद शिंदे यांच्या येण्याने देवमाणूस २ या मालिकेचा घटलेला टीआरपी निश्चितच वर येणार आहे. या नव्या भूमिकेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!