बॉलिवूड चित्रपटाला होणारा विरोध आणि मराठी चित्रपटातून सादर होणारे नवीन प्रयोग हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपट असो वा अक्षय कुमारचा रक्षाबंधन या चित्रपटांना भारतात अनेकांनी बॉयकॉट केलेले पाहायला मिळाले. तापसी पन्नूचा दोबारा चित्रपट देखील चांगले कथानक असूनही बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. अवघ्या काही लाखांमध्ये बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या ह्या चित्रपटाला स्क्रिनिंगवरून आपला गाशा गुंडाळावा लागला. याचाच फायदा गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना मिळू लागला आहे. टाकटक २ हा चित्रपट देखील प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवत आहे.
पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने २.११ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. सलील कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचे देखील भरभरून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या दगडी चाळ २ हा चित्रपट प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचून आणत आहे. त्यामुळे या चित्रपटातून डॅडींची जादू खूपच प्रभावी ठरलेली पाहायला मिळत आहे. अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे, नेहा बाम, यतीन कार्येकर या कलाकारांनी हा चित्रपट आपल्या अभिनयाने चांगला रंगवला आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या देखील उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. आवर्जून पाहावा असा दगडी चाळ २ चित्रपट प्रेक्षकांना निराश करणार नाही असेच तात्पर्य यातून मिळत आहे.
शुक्रवारी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ५१ लाख ८२ हजारांची कमाई केली. विकेंडमुळे दुसऱ्या दिवशी तब्बल ७० लाख ४८ हजारांचा गल्ला चित्रपटाने आपल्या खात्यात जमा केला. रविवारी प्रेक्षकांनी चित्रपट गृहात गर्दी करत तब्बल ८३ लाखांपर्यंत कमाई करून दिली. अवघ्या तीन दिवसातच चित्रपटाने २ कोटी ५ लाखांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला. थोडक्यात मकरंद देशपांडेने साकारलेल्या भारदस्त डॅडी, अंकुश चौधरीचा दमदार सुर्या आणि पूजा सावंतच्या कलरफुल सोनलची जादू चित्रपट सुपरहिट करणार आहे. मागील काही दिवसात मराठी चित्रपट आता बॉलिवूड चित्रपटांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत. त्यात भर म्हणजे ‘मी तुम्हाला आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका’ हे आलिया भट्टचे विधान देखील आता चर्चेचा विषय ठरू लागले आहे.