सन मराठी वाहिनीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजवर सुंदरी, संत गजानन शेगावीचे, प्रेमास रंग यावे, क्षेत्रपाल श्री वेतोबा अशा कौटुंबिक तसेच अध्यात्मिक धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता लवकरच या वाहिनीवर सावली होईन सुखाची ही आगळीवेगळी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेतली ही आई आपल्या मुलीला घेऊन एका मोठ्या बंगल्यात राहते. पण मालकीण म्हणून नाही, तर ती घरात मोलकरीण म्हणून वावरत असते. या आईची हीच संघर्षमय कहाणी सावली होईन सुखाची या मालिकेतून दाखवली जाणार आहे.
अभिनेता रौनक शिंदे आणि अभिनेत्री सीमा कुलकर्णी या मालिकेतून प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या दोघांनी याअगोदर चित्रपट मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता प्रथमच ते प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर मालिकेतली चिमुरडी प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मालिकेत ही चिमुरडी बिट्टीचे पात्र साकारत आहे. येत्या १४ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांना विशेष भावला असून त्यातल्या ह्या घाऱ्या डोळ्यांच्या चिमुरडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. ही भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे आरंभी उबाळे. आरंभी ही मूळची नाशिकची पण सध्या ती आपल्या आईवडिलांसोबत मुंबईत वास्तव्यास आहे.
आरंभी सहा वर्षांचीच आहे पण एवढ्या कमी वयात तिने हिंदी मालिकेतून पदार्पण केले आहे. नाशिक मध्ये असताना आरंभीने क्षण या लघुपटातून काम केले होते. वाहतुकीच्या नियमांचे पालन का आणि कसे करायचे हे या लघुपटातून दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुम है किसीं के प्यार में या हिंदी मालिकेत ती एका छोट्याशा भूमिकेत झळकली होती. एका आयस्क्रीमच्या जाहिरातीतून आरंभी टीव्हीवर सुद्धा झळकली. मात्र आता प्रथमच ती एका मराठी मालिकेतून महत्वपूर्ण भूमिकेत झळकताना दिसणार आहे. घाऱ्या डोळ्यांची ही क्युट आरंभी मालिकेच्या प्रोमोमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या निरागस अभिनयाची झलक या प्रोमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या पहिल्या वहिल्या मराठी मलिकेसाठी आरंभीचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.