गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभिनेत्री निशिगंधा वाड मराठी सृष्टीतून सक्रिय नव्हत्या. मधल्या काळात त्यांनी हिंदी मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता त्यामुळे त्या हिंदी मालिकेतच जास्त रुळलेल्या पाहायला मिळाल्या. काही वर्षांपूर्वी त्यांचे पती दीपक देऊळकर यांनी ईश्वरी व्हिजन प्रस्तुत “श्री गुरुदेवदत्त” ही पौराणिक मालिका स्टार प्रवाहा वाहिनीवर आणली होती मात्र या मालिकेला विरोध होत असल्याने मालिका अर्ध्यावरच बंद करावी लागली होती. या मालिकेच्या सेटवर बऱ्याचदा निशिगंधा वाड यांनी आपल्या लेकिसोबत ईश्वरी सोबत हजेरी लावली होती. त्यामुळे मराठी सृष्टीशी त्यांची नाळ या मालिकेच्या माध्यमातून अजूनही जोडली गेलेली पाहायला मिळाली होती.
आता लवकरच निशिगंधा वाड मराठी मालिकेतून सक्रिय होणार आहेत. “जय भवानी जय शिवाजी” ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून निशिगंधा वाड जिजाऊंच्या तगड्या भूमिकेत दिसणार आहेत. जवळपास १० वर्षानंतर निशिगंधा वाड या मराठी मालिकेतून पुनरागमन करत आहेत. या भूमिकेबाबत त्या खूपच उत्सुक असलेल्या पाहायला मिळतात. या ऐतिहासिक मालिकेचा त्या एक भाग बनणार आहेत या भूमिकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ” पालनकृत, ताठ कण्याच्या, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे…. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे…इतकी कणखर भूमिका साकारणं हा माझ्यासाठी दैवी योग आहे”.
डॉ निशिगंधा वाड या डॉ. विजया वाड यांची मुलगी आहेत. विजया वाड या मराठी लेखिका व बालसाहित्यिका आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या ९ डिसेंबर २००५ ते ३० जून २०१५ पर्यन्त अध्यक्षा होत्या. आदिवासी मुलींची शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून स्वतः मुली दत्तक घेणे, इतरांस प्रवृत्त करणे. गणपती, दिवाळीत आदिवासींना जेवण देणे. पदपथावरील मुलांसाठी गाणी – गोष्टी, छंदवर्ग जोपासणे,
मुलींची शैक्षणिक गळती थांबावी म्हणून मातामेळावे, पालक प्रबोधन करणे, त्यांना आत्मविश्वास वाटावा, त्यांची भीती दूर व्हावी ह्यासाठी व्याख्याने देणे ही सर्व सामाजिक कार्ये त्यांनी आपल्या लेकीलाही शिकवली आहेत त्याचमुळे निशिगंधा वाड या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणूनही ओळखल्या जातात. आता अशाच एका भूमिकेत जगण्याची नामी संधी त्यांना मिळत आहे. जय भवानी जय शिवाजी या त्यांच्या आगामी मालिकेतून जिजाऊंची भूमिका त्या तितक्याच ताकदीने वठवतील यात शंका नाही. या आव्हानात्मक भूमिकेसाठी निशिगंधा वाड याना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!!!…