बाहुबली ५०० कोटी, टायगर जिंदा है व पीके २०० कोटी, पुष्पा ४०० कोटी, आरआरआर आणि केजीएफ ५५० कोटी हे आकडे हिंदी दाक्षिणात्य सिनेमांच्या बॉक्सऑफिसवर दिसतात. कारण त्यांचे बजेटच काही शे कोटींच्या घरात असते. मराठीला सध्या जरी हे दिवस नसले तरी मराठी सिनेमा बनवण्यातील कल्पकता आणि प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता मराठी सिनेमाही शंभर कोटीच्या घरात जायला वेळ लागणार नाही. असं म्हणत अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याने लक्ष वेधून घेतले. तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शेर शिवराज या सिनेमाने चार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
सध्या शेर शिवराजची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध माध्यमांशी संवाद साधत आहेत. पुण्यातील एका रेडिओ चॅनलशी संवाद साधताना चिन्मयला बॉक्स ऑफिसच्या यशाच्या गणितावरून बोलतं केलं. तेव्हा मराठी सिनेमाकडे पाहण्याचा चिन्मयचा सकारात्मक दृष्टीकोन त्याच्या चाहत्यांना भलताच आवडला. चिन्मय म्हणतो, मराठीचं मार्केट आणि बजेट कोटींमध्ये नाही. आम्हालाही वाटतं की बाहुबली बनवावा, पण त्या सिनेमांच्या निर्मितीचा खर्च काही शे कोटीत आहे. मराठीत अजून कोटीच्या मागे शे हा शब्द लागायचा आहे. बाब्या खातो दहा लाडू पण त्याला देतो कोण अशी मराठीची अवस्था आहे, पण हे चित्र नक्की बदलेल. तोपर्यंत चांगलं काम करत राहणं तर आपल्या हातात नक्कीच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातील प्रत्येक प्रसंग, घटना हा सिनेमाचाच विषय आहे. अगदी भालजी पेंढारकर यांच्या काळापासून मराठी सिनेसृष्टीला ऐतिहासिक आणि तेही शिवकाळावर आधारीत सिनेमांची मोठी परंपरा आहे. पण ग्रामीण बाज, तमाशापट, विनोदी, सामाजिक, शहरी अशा वळणांनी मराठी सिनेमा बदलत गेला. अनेक चढउतारांचे अनुभव घेतल्यानंतर सकस कथा, तगडा अभिनय आणि उत्तम मांडणी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. या पंक्तीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखक अभिनेता चिन्मय मांडलेकर या जोडीने शिवकालीन प्रसंगांवर सिनेमे बनवण्याचा चंग बांधला.
श्री शिवराज अष्टक सिनेमांच्या मालिकेतील चौथे अष्टक शेर शिवराज स्वारी अफजलखान हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. तुफान प्रतिसादामुळे आठवड्या भरात दहा कोटींचा पल्ला सहज पार होताना दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानचा वध केला तो प्रसंग, त्यामागची महाराजांची रणनिती, त्यांचे युध्दकौशल्य, मावळ्यांची साथ, नेतृत्वगुण अफलातून पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आले. देशभरातूनच नव्हे तर सौदी अरेबिया, दुबई, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, कुवेत, ओमान, बहारीन, कतार येथेही या सिनेमाला पसंती मिळत आहे. अमेरिकेतील वीकेंड शोला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्रपट समीक्षकांच्या आकडेवारीतून दिसत आहे. अशा यशस्वी चित्रपटांच्या घोडदौडीवर लवकरच मराठी चित्रपट सृष्टीला बिग बजेट सिनेमे मिळतील अशी खात्री वाटते.