ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या या बातमीने अवघी मराठी सृष्टी हळहळली. सीमा देव आणि रमेश देव यांच्यासारखे कलाकार मराठी सृष्टीला लाभले हे मराठी रसिक प्रेक्षकांचं मोठं भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबात आता एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सासूच्या निधनाने भावुक झालेल्या सून स्मिता देव यांनी त्यांच्या आठवणीत एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना स्मिता देव म्हणतात की, आई वडील गमावल्याचे स्वीकारणे खरंच खूप कठीण आहे. माझी सासू माझ्या आईपेक्षा कमी नव्हती, ती खरोखर माझी सर्वात जवळची मैत्रीण होती.
मी अभिला डेट करत होते, तेव्हा तिला वाटले की मी टिपिकल बांद्रा छोकरी आहे. कालांतराने अभि आणि माझे लग्न झाल्यानंतर आमच्यात छान बॉण्डिंग तयार झाले. मी तिला आपलेसे केले आणि आम्ही आतापर्यंतचे सर्वोत्तम मैत्रिणी झालो. ती नेहमी म्हणायची की मी तिच्यासाठी सख्खी मुलगी आहे आणि माझ्यावर आईप्रमाणे प्रेम करायची. आम्ही दोघीही अभिनयची कामावरून घरी येण्याची वाट पाहत असू. ती तिची आवडती सास बहू मालिका पाहत असली कि मी तिच्या मांडीवर पडून राहायचे. माझ्या डोक्यावर हलकेच थोपटून मला दिवसभराच्या थकव्यातून दिलासा देत असे. थोड्यात कालावधीत आम्ही माय लेकी झालो होतो. साडी खरेदी, भाजी आणि किराणा खरेदी करायला आम्ही नेहमी एकत्र जायचो. या सवयीमुळे आजही दादरचे भाजीवाले माझ्या गाडीकडे धावत येऊन उत्सुकतेने आईबद्दल विचारपूस करायचे.
आईच्या प्रेमापोटी केळीचा घड पैसे न घेता द्यायचे. दुपारची झोप घेण्याआधी तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी सतत सांगायची. तिच्या बालपणीचा, तिने केलेला संघर्ष, ती बाबांना कशी भेटली, तिचे तिच्या सासूशी असलेले सुंदर नाते अगदी सर्व काही. आमचे धाकटे प्रताप काका म्हणायचे वहिनी माझी आईच आहे. आईने फक्त आपल्या मुलांवर प्रेम आणि त्यांचे संगोपन केले नाही तर भाची आणि पुतण्यांवरही तेवढीच माया करत होती. ती खरोखरच एक कणखर स्त्री होती, कुटुंबाचा सारा भार सांभाळत आम्हा सर्वांना सुंदरपणे एकत्र गुंफले होते. अभिनय आणि मी जेव्हा वेगळे राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्यासाठी हा एक धक्का होता आणि माझ्यासाठी एक कठीण आव्हान. आम्ही दोघेही त्या वियोगाला सामोरे जाऊ शकलो नाही. अनेक वर्षे मी बाबांना आणि आईला आमच्यासोबत राहण्यास विचारले. पण मला वाटले की उतार वयात दोघांनाही त्यांच्या कम्फर्ट झोनची गरज असते.