कच्चा लिंबू, हिरकणी यांसारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. अशीच एक आगळीवेगळी कलाकृती ते चंद्रमुखी चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांची नावे गुलदस्यात ठेवल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिक जाणवू लागली होती. नुकतेच आदिनाथ कोठारी खासदार दौलत देशमानेच्या भूमिकेत झळकणार असल्याचे जाहीर केले. तर चंद्राची भूमिका अमृता खानविलकर साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता वाजले की बारा या गाण्यातून अमृताने सादर केलेली लावणी अमाप प्रसिद्धी मिळवून गेली होती. चंद्रमुखी चित्रपटात अशाच लावण्यावतीची म्हणजेच चंद्राची भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाचे चित्रीकरण चालू झाले होते. चित्रपटाच्या नायक आणि नायिकेबाबत सुरुवातीपासूनच गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळे चंद्रा कोण आहे? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. चंद्रमुखी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल. त्या दिवशी चंद्रा कोण आहे हे सांगितले जाईल असे प्रसाद ओकने ठरवले होते. त्यानंतर अमृता खानविलकरच चंद्रा आहे हे समजल्यावर तीने या भूमिकेबाबत बोलण्यास सुरुवात केली आहे.
चंद्रमुखी कशी आहे हे सांगताना अमृता म्हणते की, चंद्रा म्हणजे संघर्ष, चंद्रा म्हणजे प्रेम, चंद्रा म्हणजे त्याग, चंद्रा म्हणजे बलिदान, चंद्रा म्हणजे कृष्णभक्त, नृत्यांगना. लोककलेला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी चंद्रमुखी या चित्रपटाची निर्मिती झाली. गेल्या दोनवर्षात चंद्रमुखीने एवढा संघर्ष केला आहे की, लोकांपर्यंत येण्यापासून ते चित्रीकरण करण्यापर्यंत तुम्हाला खूप अनुभव देऊन जातो. चंद्रमुखी ही माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची फिल्म आहे. मी खूप नशीबवान आहे की प्रसाद ओक, अजय अतुल, चिन्मय मांडलेकर, अक्षय बरदापुरकर, संजय मेमाणे, आदिनाथ कोठारे यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली.
अजय अतुल यांचं आणि माझं नातं अत्यंत दैवी आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीतरी उत्कृष्ट करू पाहते तेव्हा त्यांचा आशीर्वाद आणि साथ लाभते. चंद्रमुखी कशी आहे याबद्दल बोलायचं झालं तर खूप बोलता येण्यासारखं आहे. पण तिचा संघर्ष आणि निरागसता माझ्यातही आहे त्यामुळे मला ती खूप भावते. चंद्रामधली मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ती कृष्णभक्त आहे. त्यामुळे ही चंद्रा कशी आहे हे तुम्हाला चित्रपटातूनच अधिक समजेल असे म्हणत अमृताने चंद्रमुखी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रित केले आहे.