मराठी मालिका ठरलं तर मग हि स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून गेल्या नऊ आठवड्यापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्री वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल ठरली आहे. सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं खरं गुपित खास मित्र चैतन्यला ठाऊक आहे. मात्र चैतन्य हे सगळं गुपित साक्षी समोर उलगडणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण साक्षी हळूहळू चैतन्यवर प्रेम दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. साक्षीच्या कारस्थानात चैतन्य मात्र पुरता अडकणार की वेळीच सावध होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. चैतन्यच्या भूमिकेमुळे चैतन्य सरदेशपांडे हा कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे.
चैतन्यने वयाच्या ४ वर्षापासून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. नाट्य स्पर्धा, एकांकिकामधून त्याने उत्कृष्ट अभिनयाची, लेखनाची बक्षिसं मिळवली आहेत. यातूनच पुढे त्याला चित्रपट, मालिकेतून व्यावसायिक नाटकातून झळकण्याची नामी संधी मिळत गेली. चैतन्य सरदेशपांडे या कलाकाराला अभिनयाचे बाळकडू त्याच्या घरातूनच मिळालेले आहे. चैतन्य हा प्रसिद्ध अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा आहे. धनजय सरदेशपांडे हे नाट्य, चित्रपट अभिनेते आहेत. नुकतेच ते झी मराठीवरील चंद्रविलास मालिकेतून नाना आजोबांची भूमिका साकारताना दिसले होते. नाटकाचे वेड त्यांना खूप वर्षांपासून होते. नाटक लिहिणे, दिग्दर्शन करणे हे त्यांचे आवडते छंद होते. फारच टोचलंय हे त्यांनी सादर केलेलं एकल नाट्य खूप लोकप्रिय झालेलं पाहायला मिळालं.
ठोंब्या ठोंबीची गोष्ट, संगीत दहन आख्यान, कातळडोह, आदिंबाच्या बेटावर, जाईच्या कळ्या अशा बाल नाट्यांचे त्यांनी लेखन केले आहे. तसेच काही नाटकातून त्यांनी भूमिकाही साकारल्या आहेत. नुकतेच त्यांनी पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतून आमदाराची भूमिका साकारली होती. राजा राणी ची गं जोडी, चंद्रविलास मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. आपल्या मुलाने बुद्धिमत्तेच्या आणि अभिनयाच्या जोरावर या सृष्टीत नाव कमावलं, याचा धनंजय सरदेशपांडे यांना सार्थ अभिमान आहे. कॉलेजमध्ये असताना चैतन्यने एक एकांकिका लिहिली होती. पण त्याचे कथानक खूपच छोटे असल्याने त्याने ते कोणाला दाखवले नव्हते. एकदा ही एकांकिका वडिलांनी पाहिली त्यावेळी त्यांनी चैतन्यच्या लेखणीचं मोठं कौतुक केलं होत. दुरुस्त, घेमाडपंथी, विसर्जन, उकळी, ठसका, गुगलिफाय यांचे लेखनही त्याने केले असून त्याच्या कलाकृतींना नावाजले गेले आहे.