भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेट क्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली आणि रांची येथे सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु काही दिवसांपूर्वी धोनीने ग्राफिक ऍनिमेटेड कादंबरीवर आधारित असलेल्या अथर्व द ओरोजीन या आगामी प्रोजेक्टचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो ऍनिमेटेड काल्पनिक कादंबरीतील अथर्व या एका योध्याच्या अवतारातील नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. त्याचा हा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर देण्यात आल्या आहेत. धोनी एका सुपरहिरोच्या भूमिकेत दिसल्यामुळे ही एक ऍनिमेटेड फिल्म असावी किंवा वेबसिरीज असावी असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र या बाबींवर नुकताच एक खुलासा करण्यात आला आहे.
अथर्व द ओरिजिन ही कुठली वेबसिरीज नसून एक काल्पनिक कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखन रमेश थमिलमनी यांनी केले आहे. कविन आदीथ्य यांनी या कादंबरीचे एडिटिंग केले असून वरजू स्टुडिओ आणि मिडास डील प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे. १५० पानांच्या ह्या कादंबरीत महेंद्रसिंग धोनी हा योध्याच्या भूमिकेत पुस्तकाच्या कव्हरपेजवर झळकला आहे. आम्हाला नायकाच्या भूमिकेसाठी अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याची अपेक्षा होती. आमच्या कादंबरीतील अथर्व या सुपरहिरोच्या लूकमध्ये रिअल लाईफमधला खरा हिरो म्हणून महेंद्रसिंग धोनी त्याजागी अगदी फिट बसला आहे. त्याने माझ्या पुस्तकासाठी केवळ त्याचा चेहरा दिला नसून आम्हाला मोठे सहकार्य देखील केले आहे.
असे मत रमेश थमिलमनी यांनी व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाची पहिली कॉपी ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. अथर्व द ओरिजिन ह्या कादंबरीमध्ये नायकाच्या भूमिकेसाठी धोनीचा लूक वापरण्यात आला आहे. ही एक अशी कादंबरी आहे ज्यात एक योद्धा दुष्टांचा नाश करताना दिसणार आहे. नायकाला वेगवेगळी आव्हानं पेलण्याची संधी दिल्याने या कादंबरीची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. कादंबरी बाजारात उपलब्ध झाली असून वाचकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कादंबरी महेंद्र सिंग धोनीच्या रंगीत कव्हर फोटोमुळे आकर्षक वाटू लागली आहे. यावर भविष्यात कुठला चित्रपट आल्यास वावगे ठरायला नको असे मत कादंबरीचे लेखक रमेश थमिलमनी यांनी व्यक्त केलं आहे.