कलाक्षेत्र हे बेभरवशाचे मानले जाते. आज हातात काम असेल तर पुढे देखील काम मिळेलच याची शाश्वती मुळीच देता येत नाही. पुन्हा काम मिळवण्यासाठी कलाकारांना नेहमी प्रयत्न करावे लागत असतात. पण यातून पर्यायी मार्ग म्हणून अनेकजण हॉटेल व्यवसायाची वाट धरतात. आई कुठे काय करते मालिकेतील अभिषेकचे पात्र निभावणारा निरंजन कुलकर्णी याने देखील हाच पर्याय निवडलेला पाहायला मिळतो आहे. निरंजन कुलकर्णी हा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीशी जोडला गेलेला आहे मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती अभिषेकच्या भुमीकेने.
जावई विकत घेणे आहे ही निरंजनची पहिली मराठी मालिका, या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत झळकला होता. उंच माझा झोका, गणपती बाप्पा मोरया, आपलं बुवा असं आहे यामधून तो महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. त्यामुळे एक अभिनेता म्हणून निरंजन मराठी सृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून स्थिरस्थावर झालेला पाहायला मिळतो. मात्र असे असले तरी केवळ आभिनयावरच अवलंबून न राहता त्याने हॉटेल व्यवसायाकडे आपले पाऊल वळवलेले पाहायला मिळत आहे. निरंजन कुलकर्णी आणि त्याचा मित्र मनोज पांगेरकर या दोघांनी मिळून ठाण्यामध्ये बडीज सँडविच या नावाने रेस्टॉरंट सुरू केले आहे. हॉरीझॉन हायस्कुलच्या समोर, घोडबंदर, ठाणे पश्चिम येथे त्यांचे हे रेस्टॉरंट दिमाखात उभे आहे.
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या रेस्टॉरंटला अभिनेत्री मधुरा जोशी, गुरू दिवेकर, प्रणिता आचरेकर या सेलिब्रिटींनी भेट दिली होती. निरंजनचा चाहता वर्गही खूप मोठा आहे, त्यांनी या रेस्टोरंटला हजेरी लावली आहे. नुकताच निरंजनने सोशल मीडियावरून त्याच्या रेस्टॉरंट मध्ये स्वतः चहा बनवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावरून अनेकांना निरंजन हॉटेल व्यवसायात उतरला असल्याचे समजले होते. सेलिब्रिटींनी देखील त्याला या क्षेत्रात येण्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तुझ्या रेस्टॉरंटला आम्ही नक्की भेट देऊ असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. या नवीन व्यवसायानिमित्त निरंजन कुलकर्णी याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.