झी मराठी वाहिनीवर बँड बाजा वरात हा शो प्रसारित होत आहे. या शोमध्ये आता नव्याने बदल केले जात आहेत. अगोदर या शोमध्ये लग्न ठरलेल्या दोन वेगवेगळ्या जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात येत होते. त्यांना वेगवेगळे टास्क देऊन बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात होती. या शोचे सूत्रसंचालन पुष्कराज चिरपुटकर करत आहे. तर रेणुका शहाणे परिक्षकाची भूमिका बजावताना दिसल्या. आता याच शोमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या नव्या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
यामुळे पुष्करराज आणि रेणुका शहाणे या शोचा भाग नसणार हे निश्चित झाले आहे. या नव्या शोमध्ये प्रेक्षकांना सेलिब्रिटींच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, भारत गणेशपुरे असे मोठमोठे सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होऊन आपल्या सहचारिणीसोबत पुन्हा लग्नाचा घाट घालताना दिसणार आहेत. या सेलिब्रिटी पर्वात भारत गणेशपुरे आणि त्यांची पत्नी अर्चना गणेशपुरे सहभागी होऊन ही धमालमस्ती अनुभवणार आहेत. २०१८ साली भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. याला एक खास कारण होते, काही वर्षांपूर्वी चला हवा येऊ द्याची टीम जगप्रवासाला गेली होती. तिथे भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक येऊन गेला होता.
ज्योतिषशास्त्रावर भारत गणेशपुरे यांचा भयंकर विश्वास आहे. त्यावेळी गुरुजींनी त्यांना लग्नगाठ सैल होत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अठरा वर्षानंतर म्हणजेच २०१८ साली त्यांनी आपल्या राहत्या घरीच पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्नाचा घाट घातलेला पाहायला मिळाला होता. त्यावेळी भारत गणेशपुरे यांचे दुसरे लग्न सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. श्रेया बुगडेने त्यांच्या या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या दुसऱ्या लग्नानंतर आता झी मराठीच्या बँड बाजा वरात या शोमध्ये सहभागी होऊन भारत गणेशपुरे पत्नी अर्चना सोबतच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत.
त्यामुळे या शोची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या लग्नाला त्यांचा मुलगा देखील आवर्जून उपस्थित राहणार आहे. याशिवाय मराठी सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. नयना आपटे, कमलाकर सातपुते, संतोष पवार असे अनेक सेलिब्रिटी या मंचावर उपस्थित राहून भारत गणेशपुरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना दिसणार आहेत. अभिनेता भारत गणेशपुरे आणि त्यांची पत्नी अर्चना गणेशपुरे यांना उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.