प्रगल्भ आणि सशक्त अभिनेत्री म्हणून भक्ती बर्वे यांना आजही मराठी सृष्टीत ओळखले जाते. १० सप्टेंबर १९४८ रोजी सांगली जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात भक्ती बर्वे यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्या नाटकातून काम करत होत्या. सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या बालनाट्य संस्थेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी निवेदनाचे काम निभावले होते. एकदा खूप जोराचा पाऊस झाल्याने वृत्त निवेदन करणारे त्यांचे सहकारी दूरदर्शनच्या केंद्रावर पोहोचू शकले नव्हते. त्यावेळी जवळपास २ दिवस भक्ती बर्वे यांनी वृत्तनिवेदीका म्हणून जबाबदारी सांभाळली होती. चित्रपट, मालिका यांपेक्षा त्या रंगभूमीवर जास्त रुळल्या.

ती फुलराणी, आई रिटायर होतेय, अखेरचा सवाल, घरकुल, गांधी आणि आंबेडकर, जादूची वेल, अजब न्याय वर्तुळाचा अशा नाटकांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. ती फुलराणी हे त्यांचं गाजलेलं नाटक, हे नाटक नव्या ढंगात प्रेक्षकांच्या समोर आलं मात्र भक्ती बर्वे यांच्याइतकी ही भूमिका कोणीच वठवू शकलं नाही असा दावा अनेकांनी केला. १९९० साली नाट्यक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मराठी चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात सक्रिय असताना, त्यांनी हिंदी मालिकांमधूनही आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. हिंदी चित्रपट अभिनेते शफी इनामदार यांच्याशी त्यांनी विवाह केला.

विजेता, लव्ह, जुर्म, सदा सुहागन, कुदरत का कानून अशा अनेक हिंदी चित्रपटातून शफी इनामदार यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी प्रभाकर सारख्या मराठी मालिकांमधूनही काम केले होते. १३ मार्च १९९६ रोजी शफी इनामदार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत पुन्हा त्या रंगभूमीवर तेवढ्याच उत्साहाने दाखल झाल्या. भक्ती बर्वे वाईला गेल्या होत्या, मात्र रात्रीच्या परतीच्या प्रवासात ड्रायव्हरच्या चुकीमुळे गाडीला अपघात झाला. १२ फेब्रुवारी २००१ रोजी या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यांच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक सशक्त नायिका गमावल्याने मराठी सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली अशी प्रतिक्रिया त्यावेळी चंदेरी दुनियेतून देण्यात आली.