सोशल मीडियाच्या मध्यमातून कलाकार मंडळी नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याबाबत उघडपणे बोललेल्या पाहायला मिळतात. प्रेमसंबंध जुळो किंवा गाडी, घर खरेदी करणे असो या आनंदाच्या बातमीसोबतच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुःखद घटना ही कलाकार मंडळी शेअर करताना दिसतात. फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतील कविता म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने देखील सोशल मीडियावर आपल्या आजारपणाबद्दल मन मोकळेपणाने बोललेले पाहायला मिळत आहे. भाग्यश्री न्हाळवे ही गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी तोंड देत आहे.
या आजारपणामुळे तिने काही काळ मालिकेपासून दूर राहणे पसंत केले होते. काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीने आपल्या आजारपणाचे गांभीर्य सर्वांसमोर मांडले. एमआरआय काढल्यानंतर त्यात पेन्सोमनिया या आजाराचे निदान झाले होते. या आजारामुळे ठराविक असह्य वेदना होतात त्यामुळे तिला रात्रीची झोप लागत नाही. या आजाराशी ती गेल्या काही दिवसांपासून खंबीरपणे तोंड देत असून आजारपणाला दूर ठेवण्यासाठी ती नेहमीच विरंगुळा शोधत असते. नुकतेच भाग्यश्रीने आपल्या कुटुंबासोबत एक छानशी ट्रिप एन्जॉय केली. या दुःखातून थोडासा विसर पडावा म्हणून मला इथे घेऊन आल्याबद्दल तिने आपल्या भावाला आणि वहिनीला धन्यवाद दिले आहेत.
दादा, माझ्या चेहऱ्यावरचं दुःख तुला पाहता येतं, मी भाग्यवान आहे मला तुमच्यासारखी माणसं भेटली. खूप धन्यवाद वहिनी आणि अर्णव, तुम्ही माझ्या पाठीचा कणा आहात. असे म्हणून भाग्यश्री आपल्या दुखाचा क्षण विसरण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या आजारपणाबद्दल कळल्यावर सहकलाकारांनी तसेच चाहत्यांनी भाग्यश्रीला काळजी घेण्यास सांगितले आहे. तू लवकरच या आजारातून बाहेर येशील अशीही आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. भाग्यश्री न्हाळवे हिने मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुण्यातील सासवड येथे तिचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. जेव्हा शूटिंग नसते तेव्हा ती आपल्या गावी जाऊन राहते.
कलर्स मराठी वरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत भाग्यश्रीने रमाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे भाग्यश्रीला अमाप प्रसिद्धी मिळाली. परफ्युम, स्त्रीलिंगी पुल्लिंग या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. पुढे तान्हाजी या बॉलिवूड चित्रपटात भाग्यश्रीला सूर्याजींच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत बाणाबाई मल्हारराव होळकर हे पात्र तिने सुंदर रीतीने साकारले होते. मालिका चित्रपट असा प्रवास सुरू असताना म्युजिक व्हिडिओतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. अशा या हरहुन्नरी अभिनेत्री आजारपणातून लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना.