कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेमुळे बाळूमामांच्या भूमिकेतील सुमित पुसावळेने प्रेक्षकांच्या मनात श्रद्धेने आदराचे स्थान निर्माण केले आहे. सुमित कुठेही गेला की त्याला बाळूमामा म्हणून आदराने वागवतात. लहानथोर मंडळी आपोआप त्याच्या पाया पडायला येतात. असाच एक किस्सा सांगताना सुमित खरोखरच खूप भावुक झालेला पाहायला मिळाला. बाळूमामा या मालिकेच्या सेटवर अनेकजण भेटी देतात. एक आठवण सोबत रहावी म्हणून सुमितसोबत फोटो काढतात.
एके दिवशी वडील आणि त्यांचा मुलगा थेट कोल्हापूरहून सुमितला भेटायला आले होते. आणि त्यांनी सुमित जवळ आजारी आई साठी भंडारा मागितला होता. खरं तर बाळू मामाचे देवस्थान आदमापुर येथे आहे जे कोल्हापूरहुन फक्त ५० किलोमीटर अंतरावर आहे. पण ते लोक तिकडे न जाता मुंबईला आमच्या सेटवर आले. सुमित म्हणतो की, सेटवर मला सगळेजण मामा म्हणतात. माझं शूट संपलं आणि मला त्या लोकांनी बोलावलं, मला वाटलं त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचाय. पण मी जवळ जाताच ते माझ्या पाया पडले आणि रडतच म्हणाले की माझी बायको खूप आजारी आहे. तिने सांगितलंय की तुमच्या हातून जो भंडारा मिळेल तो घेऊन या त्यानेच मला बरं वाटेल. बाळूमामाच्या भूमिकेमुळे सुमितला आजवर असे अनेक अनुभव मिळाले.
पण हा किस्सा सुमीतला अजूनही आठवला की त्याच्या अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं. ती लोकं आदमापूरला न जाता मुंबईला आले. रात्रीच्या गाडीने येऊन त्यादिवशी पहाटे पर्यंत स्टेशनवर त्यांनी वेळ घालवला. सेटपर्यंत ते कसे पोहोचले माहीत नाही पण त्यांची बाळूमामांवर असलेली श्रद्धा त्यांना माझ्यापर्यंत घेऊन आली. हा अनुभव सुमितसाठी खरोखरच अविस्मरणीय म्हणावा लागेल. बहुतेक धार्मिक मालिकांमधून अशा घटना नेहमीच अनुभवायला मिळतात. ९० च्या दशकातील प्रसिद्ध रामायण ही मालिका सुद्धा तेवढीच प्रभावी ठरली होती. आजही प्रभू श्री राम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना चाहत्यांनी पाहिले की आपोआप त्यांच्या पुढे नतमस्तक होतात हे सर्वश्रुत आहे.