कलाकार मंडळी आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर विसंबून न राहता व्यवसायाची वाट धरू लागले आहेत. कारण तुम्हाला एखाद्यावेळी या क्षेत्रात काम मिळते पण त्याबद्दल आयुष्यभराची शाश्वती देणे कठीण असते. त्याचमुळे मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवला तर भविष्याची चिंता देखील मिटवता येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाकडे वळू लागली आहेत. अनघा अतुल, निरंजन कुलकर्णी, नम्रता प्रधान, श्रेया बुगडे यांनी स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला. तर सैराट फेम सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख यानेही एका नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली पाहायला मिळाली.
सैराट हा मराठी सृष्टीतील तुफान गाजलेला चित्रपट. या चित्रपटाचा हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेत रिमेक बनवण्यात आला. सैराट चित्रपटाने आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यासोबतच तानाजी गलगुंडे, अरबाज शेख, सुरज पवार हे सहाय्यक कलाकार देखील प्रसिद्धीच्या झोतात आले. हे सर्व कलाकार अजूनही नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसतात. त्यामुळे या कलाकारांना आर्थिक स्थिरता मिळाली आहे. तानाजी गलगुंडे याने तर पायावर उपचार केले आहेत. यासोबतच जर चित्रपटात कधी काम मिळाले नाही तर गावची शेती करता यावी म्हणून त्याने जमीन सुस्थितीत करून घेतली आहे.
तर अरबाज शेख याने नवीन सुरुवात म्हणत बेक बडीज या नावाने स्वतःचे एक छोटेसे कॅफे सुरू केले आहे. केक आणि कॅफे स्वरूपात त्याने या व्यवसायाला सुरुवात केली आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी या कॅफेचे उद्घाटन आहे. सिंहगड लॉ कॉलेज समोर, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे त्याने हे कॅफे सुरू केलेले आहे. रिंकू राजगुरू हिने अरबाजला या नवीन व्यावसायानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर तीन दिवसांपूर्वी खास मित्र तानाजीचा वाढदिवस अरबाजने त्याच्या या कॅफे मध्ये थाटात साजरा केलेला पाहायला मिळाला. सैराट चित्रपटानंतर अरबाज शेख अनेक चित्रपटातून छोट्या मोठ्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला.
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात अरबाज एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचा हा प्रवास सुरु असताना त्यातून मिळणारा पैसा योग्य मार्गी लागावा या हेतूने अरबाजने व्यवसायात पाऊल टाकले आहे. या निर्णयामुळे निश्चितच त्याच्या भविष्याची चिंता मिटणार आहे. यानिमित्ताने त्याचे मोठे कौतुकही होत आहे.