तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या आई, बायको, मुलगी, बहीण, मावशी, सासू, आत्या अशा सर्वाचाच हा सिनेमा असणार अशी खात्री दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटातून दिली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एम व्ही बी मीडिया निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या आगामी सिनेमाची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटातून सर्रासपणे दिसणाऱ्या पुरुषांच्या मक्तेदारीला आळा घालत हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला बाईपण अनुभवायला आणि स्वच्छंदी जगायला शिकवणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी सृष्टीतील नामवंत अभिनेत्री महत्वाच्या भूमिका निभावताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब गॉगल घालून अगदी डॅशिंग अंदाजात पोज देताना दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता तमाम स्त्री वर्गाला लागून राहिली आहे. केदार शिंदे आपल्या या चित्रपटाबाबत म्हणतात की, “आई, आजी, बहिण, पत्नी, मुलगी, काकू, आत्या, मावशी. अशी अनेक जिव्हाळ्याची नाती. मी सुज्ञ झालो तो यांच्याच संस्काराने. ‘अगं बाई अरेच्चा’ सिनेमा करताना स्त्रीयांच्या मनातल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला. आणि ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमात त्यांच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे”.

बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी सृष्टीतील नामवंत अभिनेत्री चित्रपटातून एकत्रित आलेल्या पाहायला मिळणार आहेत. असा प्रयोग झी मराठी वाहिनीने मालिकेतून केला होता. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची मुख्य भूमिका असलेली होणार सून मी ह्या घरची या मालिकेत देखील सहा अभिनेत्री एकत्र आल्या होत्या. त्यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच एक भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटामुळे रोहिणी हट्टंगडी यांना मिळाली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटातील सहा नयिकांवरचा पडदा तूर्तास जरी हटला असला तरी, नायकाच्या भूमिकेत कोण झळकणार याचीही अधिक उत्सुकता आहे. चित्रपटाच्या या सर्वच टीमला प्रेक्षकांचा निश्चितच भरभरून प्रतिसाद मिळेल अशी खात्री वाटत आहे.