मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री अतिषा नाईक ह्यांनी आजवर विनोदी तसेच गंभीर स्वरूपाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. हसा चकट फू, घडलंय बिघडलय, अशीही श्यामची आई, बन मस्का, घाडगे अँड सून अशा मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अतिषा नाईक ह्या एक परखड मत मांडणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या भूमिका देखील तशाच स्वरूपाच्या असतात. श्वानप्रेमी म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख जपली आहे. सेटवर असलेल्या श्वानांचा त्यांना लळा लागतो. त्यांच्या घरीही त्यांनी श्वान पाळले आहेत.
अतिषा नाईक यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्या आपले रोखठोक मत मांडताना दिसतात. आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाच्या गमतीजमती, खाजगी आयुष्यातील गमतीजमती त्यांनी मुलाखतीत शेअर केल्या आहेत. आपल्या सावळ्या रंगाचा त्यांना कुठेही कमीपणा वाटत नाही उलट या रंगावर माझे प्रेम आहे असे त्या म्हणतात. माझे आईबाबा सावळे होते. मी जर गोरी झाले असते तर माझ्या आईवर चारित्र्याचे शिंतोडे उडले असते. त्यामुळे मी काळी सावळी बेस्ट आहे. आणि मी माझ्या या रंगावर भयंकर खुश आहे. गोरं होण्यासाठी मी आजपर्यंत कुठलीही क्रीम लावलेली नाही.
असे ते आपल्या रंगाबद्दल बिनधास्त बोलतात. अतिषा नाईक यांना मुलगी आहे. मुलीसोबत त्या फिरायला जाताना त्यांना अनेक अनुभव येत असतात. कारण समाजात एखाद्या मुलीकडे पाहण्याची लोकांची नजर कशी असते हे त्यांनी अनुभवलं आहे. याबद्दल त्या म्हणतात की, मी माझ्या मुलीबरोबर फिरायला जात असते. तेव्हा लोकांच्या तोंडातून अक्षरशः लाळ टपकलेली मी पाहिली आहे. सॉरी टू से धिस पण अशी गोष्ट खरंच घडते. तर मी एकदा असं म्हटलं होतं की अरे समोर बघ पडशील खड्डा आहे, पुढे तिथे मागे तिच्याकडे बघत चाललायेस. असे म्हणत अतिषा नाईक यांनी लोकांना जागेवरच झापलं होतं.