पछाडलेला हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, या चित्रपटात मनिषाची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने साकारली होती. लग्न झाल्यानंतर अश्विनी अभिनय क्षेत्रापासून काहीशी दुरावली. फत्तेशीकस्त, नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा या चित्रपटात ती दिसली. मात्र आता अश्विनी एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अश्विनीने काही दिवसांपूर्वी डेनीमवर बांगड्या घालून फोटोशूट केले होते; हे फोटो तिने शेअर केले होते. मात्र त्यावरून तिला काही चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे उत्तर अश्विनीने सविस्तरपणे देण्याचे ठरवले. याचे उत्तर देताना अश्विनी म्हणते की, तू डेनिम वर बांगड्या काय घातल्या आहेत?

असा प्रश्न मला नवरात्रीच्या ९ दिवसात सतत विचारला जातो! का? डेनिम मला सुटसुटीत वाटते. दिवसभर काम करताना, गाडी चालवताना इत्यादी वेळी बरी पडते. बांगड्या मला आवडतात! सणवार, कार्य असताना आवर्जून घातल्या जातात. पण नवरात्रीच्या निमित्ताने सलग ९ दिवस त्या हातात ठेवाव्या असा प्रयत्न मी करते. माझी डेनिम किंवा माझ्या बंगड्या एक मेकींवर ऑब्जेक्शन पण घेत नाहीत. फार वर्षांपूर्वी मी हैदराबादमध्ये एका फिल्मी पार्टीला गेले असताना “एकाने” कौतुकाने आणि आठवणीने माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला. हैदराबदमधील गजरे आणि बांगड्या हा एक स्वतंत्र विषय आहे. मी मिनी स्कर्ट मध्ये होते, पण देणाऱ्याच्या भावना आणि मोगऱ्याच्या सौंदर्याचा मान ठेऊन मी लगेचच तो केसांत माळला.

खरं सांगते तिथे अनेक नजरा माझ्याकडे कौतुकाने बघू लागल्या. दक्षिण भारतात वेस्टर्न आटफिट्स वर टिकली, पैंजण, बांगड्या, गजरे सर्रास वापरल्या जातात. नॉर्थ मध्ये पण मोठे लाल चुडे, बोटभर जाडीच सिंदूर आणि डेनिम अशी सरमिसळ खूप बघायला मिळते. आपण मात्र डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे “गावंढळ”; बांगड्या घातल्या म्हणजे काकू बाई. अशी समजूत करून घेतली आहे. वावरायला सोपे कपडे परिधान नक्कीच करावेत. पण त्या बरोबर आपल्या संस्कृती प्रमाणे बांगड्या घातल्या तर बिघडलं कुठे? आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नका घालू.पण ज्यांना आवडतं त्यांनी कोणाची पर्वा न करता खुशाल घाला. हवं ते घालणाऱ्या उर्फी जावेद आणि तत्सम इन्फ्लुइन्सर्स पेक्षा, हे इंडो वेस्टर्न कॉम्बिनेशन फारच सुसह्य आहे नाही का.
साधारण २५७८ बायकांनी मला माझ्या डेनीम आणि बांगड्या बद्दल विचारलं; त्या सर्वांसाठी हे “स्पष्टीकरण”! बांगड्या, पैंजण, टिकली, गजरा कधीही कुठेही कशावरही परिधान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच.” असे म्हणत अश्विनीने विशेष सूचना करत वरील प्रकट केलेलं मत हे माझं वैयक्तिक आहे. त्यामागे कोणताही बांगड्या किंवा गजरा अशा चळवळी सुरू करण्याचा उद्देश अजीबातच नाही. असेही तिने यातून सूचित केले आहे.अश्विनीच्या या म्हणण्यावर महिलांनीच नव्हे तर पुरुष मंडळींनी देखील मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अश्विनीचे मत अनेकांना पटलं देखील असल्याने त्यांनी तिची बाजू योग्य असल्याचे म्हटले आहे.