स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत जानकीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ऋषिकेश हा मालिकेचा नायक आहे पण ऋषिकेशची भूमिका कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यात ठेवले आहे..दरम्यान सविता प्रभुणे, नयना आपटे, बालकलाकार आरोही सांबरे, उदय नेने हे कलाकार मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. तर आशुतोष पत्की जानकीच्या दिराची म्हणजेच सौमित्रची भूमिका साकारत आहे. प्रतीक्षा मुंगेकर ही विरोधी भूमिकेत असून आशुतोष सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
१८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला असून आशुतोष पत्की पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमनास सज्ज झालेला पाहायला मिळतो आहे. २०१९ मध्ये झी मराठीच्या अग्गबाई सासूबाई या मालिकेतून आशुतोष छोट्या पडद्यावर झळकला होता. दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. बाबड्याच्या भूमिकेसाठी आशुतोष ओळखला जातो. त्याने साकारलेली ही विरोधी भूमिका प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे गेली होती. आशुतोष पत्की हा प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. गोट्या, वादळवाट, आभाळमाया, अवघाची संसार, मानसी, तुला पाहते रे अशा लोकप्रिय मालिकांची शीर्षक गीतं त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.
आशुतोषने संगीतात रस दाखवण्यापेक्षा अभिनयाकडे वाटचाल सुरू केली. शहीद भाई कोतवाल, अकल्पित, वन्स मोअर अशा चित्रपटातून आशुतोष मोठया पडद्यावर झळकला आहे. अग्गबाई सासूबाई या मालिकेत तो तेजस्विनी प्रधान सोबत काम करताना दिसला. मालिकेनंतर या दोघांनी त्यांची निर्मिती संस्था उभारली. पण आता आशुतोष पुन्हा एकदा मालिकेकडे वळला आहे. तब्बल ३ वर्षानंतर घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत. सौमित्रची भूमिका विरोधी असणार की सकारात्मक हे मालिका प्रसारित झाल्यावरच स्पष्ट होईल. तूर्तास या नवीन भूमिकेसाठी आशुतोषला खूप खूप शुभेच्छा.