७० च्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि देखणा नायक मिळाला तो अरुण सरनाईक यांच्या रूपाने. ४ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर येथील कलावंत असलेल्या सरनाईक यांच्या कुटुंबात अरुण सरनाईक यांचा जन्म झाला. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अरुण सरनाईक यांचे वडील पंडित शंकरराव सरनाईक हे संगीततज्ञ होते, त्यांना महाराष्ट्र कोकीळ ही पदवी मिळाली होती. तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे शास्त्रीय गायक होते. याच पार्श्वभूमीमुळे अरुण सरनाईक यांना गाण्याची तसेच हार्मोनियम आणि तबला वादनाची आवड होती. मुंबईत आल्यावर अरुण सरनाईक यांनी रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते.
व्यावसायिक रंगभूमी पासून सुरुवात केलेल्या अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. या चित्रपटात त्यांनी दुय्यम भूमिका साकारली असली तरी पुढे जाऊन त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून चित्रपटाचा प्रमुख नायक बनण्याची धमक दाखवली. वरदक्षिणा, सवाल माझा ऐका, घरकुल, मुंबईचा जावई, एक गाव बारा भानगडी, गणानं घुंगरू हरवलं, चांदणे शिंपित जा, सिंहासन, पाहुणी अशा चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका गाजवल्या. अरुण सरनाईक यांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला देखणा आणि रुबाबदार नायक मिळाला. आजही त्यांच्या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत. उत्तम अभिनयासोबतच अरुण सरनाईक हे समाजसेवेत कार्यरत होते हे बहुतेकांना परिचयाचे नसावे.
आनंदग्राम येथील रुग्णांची त्यांनी सेवा केली होती. आज अरुण सरनाईक आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या रूपाने त्यांची मुलगी त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपताना पाहायला मिळत आहे. पंढरीची वारी या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अरुण सरनाईक यांची वर्णी लागली होती. २१ जून १९८४ रोजी या चित्रपटाच्या शुटिंगहून परत येत असताना त्यांच्या गाडीच्या अपघातात अरुण सरनाईक त्यांचा मुलगा आणि पत्नी या तिघांचेही निधन झाले. त्यांची मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी मिरजला होती. सविता सरनाईक हे अरुण सरनाईक यांच्या एकुलत्या एक मुलीचे नाव आहे. शालेय शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या सविता सरनाईक यांनी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले होते.
कोल्हापूर येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबईतून त्यांनी महाविद्यालयिन शिक्षण घेतले. पुढे मिरजला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले. याचवेळी सविता सरनाईक कुटुंबियांच्या निधनामुळे खचून गेल्या, मात्र हिंमत न हारता स्वतःला सावरत त्यांनी डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ ही पदवी मिळवली. वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून सेवा केली. एवढेच नाही तर पुण्यातील चाकण परिसरात अनेक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिबिरे आयोजित केली. आजही त्या आपटे रोडवरील स्नेहधाम आश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या पतीची देखील साथ मिळते. सविता सरनाईक यांनी प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईकनवरे यांच्याशी विवाह केला.
रणजित नाईकनवरे यांच्या वडिलांनी बिल्डरचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पश्चात आता या करोडोंचा कारभार त्यांची दोन मुलं, सून आणि नातवंड सांभाळत आहेत. नील आणि सानिया ही दोन अपत्ये त्यांना आहेत. अरुण सरनाईक यांचे कुटुंबिय अपघातात निधन पावले हे सर्वांना माहीत होते मात्र त्यांना एक मुलगी देखील आहे हे बहुतेकांना माहीत नव्हते. आज अरुण सरनाईक यांची मुलगी समाजसेवेत रुजू आहेत हे पाहून तमाम प्रेक्षकांना सविता ताईंचं मोठं कौतुक वाटत आहे.