मालिका चित्रपटात नाव कमावलेले बरेचसे कलाकार यश मिळाल्यानंतर सुखसोयींचा पाठपुरावा करतात. मात्र या यशात समाधान माननं आणि त्याला हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवत वेळोवेळी योग्य ते निर्णय घेणं हे खूप कमी जणांना सुचतं. असाच काहीसा अनुभव कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा मालिकेतील कलाकाराने घेतला आहे. या मालिकेत वरूणची भूमिका संकेत कोर्लेकर याने साकारली आहे. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करत संकेतने अभिनय क्षेत्रात जे यश मिळवलं आहे ते उल्लेखनीयच म्हणावं लागेल. कारण या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लहानपणापासूनच मोठी मेहनत घेतली होती. संकेतचे बाबा अविनाश कोर्लेकर यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं.
मात्र काही कारणास्तव हे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने त्यांनी संकेतला लहानपणापासूनच अभिनयाचे धडे देण्यास सुरुवात केली. एकपात्री स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा गाजवत असताना त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. पुढे टकाटक, गोळाबेरीज, हम बने तुम बने, विठू माऊली, डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा, अजूनही बरसात आहे अशा मालिका चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. या यशस्वी वाटचालीत त्याला मित्रांकडून नातेवाईकांकडून ‘अजून कार का घेतली नाही?’ असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले. या प्रश्नावर मात्र संकेतने चोख उत्तर देताना म्हटले आहे की, पैलवान ३ वर्षांचा झाला, माझी रॉयल एन्फिल्ड. त्या निमित्ताने आजही बाईक वापरणाऱ्या आणि अजूनही “गरज नसल्याने” जाणीवपूर्वक कार खरेदी न केलेल्यांसाठी मनापासून काहीतरी खास.
घरात कार असणे म्हणजे या घरातील मुलगा किंवा मुलगी सेटल आहे. हेच आमच्या गावाकडील लोकांचे मत. पण फक्त नातेवाइकांसमोर बढाया मारायला लाखो रुपये गुंतवून ठेवणाऱ्यातला मी नाही. मला कारची गरज नसताना देखील कार विकत घेऊन दारासमोर लाखो रुपये प्लास्टिकच्या कपड्यात गुंडाळून ठेवण्यापेक्षा, ते इन्व्हेस्ट करणे मी जास्त पसंत करेन आणि मी हेच करतोय. कारण मला अजून कार का नाही घेतली? असे प्रश्न सगळ्या मित्रमैत्रिणींपासून नातेवाईकांपर्यंत विचारले गेले आणि मी त्यांना एकच उत्तर दिले. नवीन कार घेईन तर ती लक्झरी टॉप एन्ड कार असेल. नाहीतर पैलवान आणि मी खुश आहे एकमेकांसोबत. माझं एक पर्सनल मत आहे, नवीन काहीतरी उचलायचे तर मार्केट मधल्या राजालाच उचलायचे.
मग त्यासाठी कितीही वाट बघायला लागली तरी चालेल. पण जीव मारून कुवतीपेक्षा जास्त लोन काढून माज करण्यात मला तरी मजा नाही येणार. कधी कधी इव्हेंटला जाताना, रात्री थकल्यावर ट्रॅव्हल करताना जेव्हा खरच कारची गरज भासते तेव्हा ओला उबर माझ्या मदतीला धावून येतातच. कार गरजेची आहे, मान्य आहे. माझ्या सर्व मित्रांनो, जिथे काम करताय तिथे जाण्यासाठी बाईक सोयीस्कर असेल तर फक्त शोऑफसाठी रेंटच्या घरात राहून रस्त्यावर पार्क करण्यासाठी कार विकत घेऊ नका. मला माझा पैलवान आल्यापासून त्याने एकदाही शूटिंग सेटवर उशीरा सोडले नाही. कार हे स्टॅण्डर्ड मोजण्याचे यंत्र बनवून ठेऊ नका. कुणास ठाऊक, ज्याला तुम्ही बाईकवर फिरताना बघताय त्याचाकडे तुमच्यासारख्या दहा गाड्या विकत घेण्याइतकी सेविंग्स असेल.