मयूर वैद्य आर्ट टेंम्पल या नृत्य संस्थेतून अनेक गुणी कलाकार घडले. झी युवा वाहिनीवरील युवा डासिंग क्वीन या शोमध्ये परिक्षकाची भूमिका उत्तम रित्या बजावणारे याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीत नृत्य दिग्दर्शक म्हणून मयूर वैद्य प्रसिद्ध आहेत. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य त्यांची जिवलग मैत्रीण मधुरा देशपांडे हिच्यासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. मधुरा देशपांडे या देखील नृत्यकलेत निपुण असून कथक विशारद त्यांनी प्राप्त केली आहे शिवाय संगीत विषयातून एमएची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
येत्या काही दिवसातच मयूर वैद्य आणि मधुरा देशपांडे हे कलाकार लग्नबंधनात अडकणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे. वडिलांचा नृत्याला विरोध असूनही आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच जिद्द, नृत्यकलेप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर कलासृष्टीत मयूर वैद्य यांनी आपली ओळख निर्माण केली. ज्येष्ठ नृत्यगुरू आशाताई जोगळेकर आणि त्यांच्या कन्या अर्चना जोगळेकर यांच्या आशीर्वादामुळे नृत्यकलेत मयूर यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली आणि कथ्थक नृत्याच्या विविध परीक्षा देऊन मयूर यांनी नृत्यकलेतील ‘अलंकार’ ही पदवी मिळविली. नृत्यातील अलंकार पदवी मिळविल्यानंतर खऱ्या अर्थाने मयूर वैद्य यांच्या करिअरला सुरुवात झाली. मयूर यांना अनेक संधी मिळत गेल्या आणि त्याचे चीज त्यांनी केले. लोकनृत्य, रशियन बॅले यांचेही शिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या नृत्य कार्यशाळेतूनही त्यांनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज यांच्या कार्यक्रमातूनही ते सहभागी झाले आहेत. ‘नटरंगी नार’, ‘इथं हवंय कुणाला प्रेम’, ‘सख्या सजणा’, ‘जादू तेरी नजर’, ‘वन टू का फोर’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लव्ह स्टोरी’, ‘पुन्हा सही रे सही’ आदी ‘सुयोग’च्या नाटकांसाठी तसेच ‘संभवामी युगे युगे’ या महानाट्यासाठी, काही गुजराथी आणि इंग्रजी रंगभूमीसाठी आणि ‘सावरिया डॉट कॉम’, ‘रणभूमी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘बाय गो बाय’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
एक कोंकणी आणि एक हिंदी चित्रपटही त्यांच्या नावावर आहे. विविध पुरस्कार सोहळे, कार्यक्रम, दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती, फॅशन शो, खासगी मराठी, गुजराथी आल्बम आणि ‘माझे जीवन गाणे’, ‘शब्द सुरांची नाती’, ‘स्वर संग्राम’ आदी रिअॅलिटी शो साठीही नृत्य दिग्दर्शक म्हणून आपली मोहर उमटविली आहे. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘दम दमा दम’, ‘छोटे चॅम्पियन’, ‘एका पेक्षा एक-अप्सरा आली’, ‘एका पेक्षा एक-जोडीचा मामला’ या दूरचित्रवाहिन्यांवरील रिअॅलीटी शोसाठी परीक्षक म्हणूनही मयूर यांनी काम केले होते.