महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पिंकीचा विजय असो ही स्टार प्रवाहवरील मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अल्लड पिंकी युवराजच्या प्रेमात पडते. लग्नानंतर ती युवराजचे मन जिंकते मात्र तिच्या मार्गात सासू अडथळे आणते. पिंकीने युवराजला सोडून जावं यासाठी ती खूप प्रयत्न करते. मात्र आता युवराजचे वडीलच पिंकीचा अपघात घडवून आणतात. आपलं सत्य कोणाला समजू नये यासाठी ते पिंकीचा काटा काढतात. मात्र या अपघातातून पिंकी सुखरूप बचावते. इथेच मालिकेत एक धक्कादायक ट्विस्ट येतो.
डॉ देवयानी सदावर्ते सहकाऱ्यांसोबत ट्रेकला चाललेली असते. त्या जंगलात त्यांना पिंकी गंभीर अवस्थेत सापडते. अपघातात चेहरा खराब झाल्यामुळे सदावर्ते पिंकीचा चेहरामोहराच बदलून टाकतात. पिंकीची भूमिका शरयू सोनवणे हिने तिच्या बिनधास्त अभिनयाने गाजवली होती. मात्र आता ही भूमिका अभिनेत्री आरती मोरे साकारताना पाहायला मिळणार आहे. आरती मोरे ही गुणी अभिनेत्री आहे. आजवर तिने मालिकांमधून सहाय्यक भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली होती. मात्र आता पिंकीचा विजय असो या मालिकेतून ती प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आरती उत्तम अभिनेत्री असली तरी पिंकीच्या भूमिकेत शरयुला प्रेक्षकांनी आपलेसे केलेले होते. दीड वर्षांपासून शरयुने वठवलेल्या या भूमिकेत आता दुसऱ्या कोणाला पाहणे प्रेक्षकांना मुळीच रुचलेले नाही.
प्रेक्षकांनी त्यामुळे या मालिकेच्या ट्विस्टवर नाराजी दर्शवली आहे. शरयूचा अभिनय पिंकीच्या भूमिकेसाठी तोडीसतोड होता. तर आरतीचा आवाज या भूमिकेला सूट होत नाही असे बोलले जात आहे. पण आरतीला प्रेक्षकांनी अजून थोडा वेळ देणे गरजेचे आहे. तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून घेईल असा विश्वास आहे. दरम्यान या मालिकेत सदावर्तेच्या भूमिकेत किशोरी शहाणे यांची एन्ट्री झाली आहे. किशोरी शहाणे सध्या हिंदी मालिका सृष्टीत स्थिरस्थावर झाल्या आहेत. डॉ सदावर्ते ही भूमिका छोटीशी आहे पण त्यांच्या मराठी सृष्टीतील पुनरागमनामुळे त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तूर्तास पिंकीच्या भूमिकेत आरती मोरेला प्रेक्षकांनी स्वीकारले नसल्याने मालिकेच्या बाबतीत काहीसा नाराजीचा सूर उमटत आहे.