झी मराठी वाहिनीवर नव्या दमाच्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून नवीन रिऍलिटी शो आणि नवीन मालिकांची चलती झी मराठीवर पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीचा घटलेला टीआरपी पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी वाहिनीने हा प्रयत्न केला आहे. बस बाई बस आणि डान्स महाराष्ट्र डान्स हे रिऍलिटी शो झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या समोर आणले आहेत. बस बाई बस या शोला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर नवा गडी नवं राज्य, तू चाल पुढं याही नवीन कौटुंबिक मालिका झी मराठीवर दाखल होत आहेत. १२ जून रोजी सत्यवान सावित्री ही पौराणिक कथेवर आधारित मालिका झी मराठी वाहिनीवर दाखल झाली होती.
मात्र या मालिकेला प्रेक्षकांनी सफशेल नाकारलेले पाहायला मिळत आहे. मालिकेला अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने आता या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली आहे. अवघ्या दोन महिन्यातच या मालिकेला गाशा गुंडाळावा लागला असल्याने एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न वाहिनीने केला आहे. श्वेता शिंदे हिच्या लागीरं झालं जी या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर तिने देवमाणूस, देवमाणूस २ अशा मालिका समोर आणल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता लवकरच श्वेता शिंदे यांची निर्मिती असलेली ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही नवीन मालिका झी मराठीवर दाखल होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अप्पी म्हणजेच कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा हा खडतर प्रवास मालिकेतून पाहायला मिळणार असल्याने ही मालिका प्रेक्षकांची मनं नक्की जिंकून घेणार हे प्रथमदर्शनी दिसून येते. मालिकेत अपर्णाची भूमिका शिवानी नाईक निभावणार आहे. तर तिच्या वडिलांच्या भूमिकेत लागीरं झालं जी मालिकेतील समाधान मामा म्हणजेच संतोष पाटील निभावणार आहे. अपर्णाचे बापू हे रिक्षा चालवतात. आपली लेक कलेक्टर झाली म्हणून ते तिला सॅल्युट करतात. मात्र सर्वांसमोर मी तुमची अजूनही अप्पीच आहे असे ती त्यांना हक्काने म्हणायला लावते. नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक हि अप्पीची भूमिका दिमाखात उभारणार याची मालिकेच्या प्रोमोमधून खात्री वाटते. सफरचंद या चित्रपटातून शिवानी नाईक प्रमुख भूमिकेत दिसली होती.
रंगबावरी या एकांकिकेतून ती मुख्य भूमिकेत दिसली. राज्यनाट्य स्पर्धेत लक्षवेधी अभिनेत्री म्हणून तिला बक्षीस मिळाले आहे. एकच वाडा नाट्यवाडा या नाट्यसंस्थेशी ती जोडली गेली आहे. राज्यनाट्य स्पर्धा एकांकिका मधून शिवानीने अभिनय साकारला आहे. आता कसं करू, मॅट्रिक, अखंड ही तिने साकारलेली काही नाटक गाजली. यातूनच तिला चित्रपटात येण्याची संधी मिळाली. सफरचंद हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच शिवानीला झी वाहिनीने मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून ती प्रथमच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या पहिल्या वहिल्या मालिकेसाठी शिवानी नाईक हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि छोट्या पडद्यावरच्या प्रवासासाठी शुभेच्छा!