कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकर हिने तिच्या खाजगी आयुष्यबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंकिताच्या घरी सुरुवातीपासूनच खूप शिस्तीचं वातावरण होतं. पाच वाजताच उठून अभ्यास करायचा दुसरं काहीच करायचं नाही. या जास्तीच्या शिस्तीमुळे मला कोंडल्यासारखं वाटायचं. मला हे नाही करायचं असं तीचं मत बनलं. शाळेत माझा पहिला नंबर यायचा अगदी ९० टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळायचे पण अभ्यास करायला अजिबात आवडत नसायचं. मी फक्त पाठांतर करायचे पण पुढं जाऊन काही करायचंय असा माझा मुळीच हेतू नव्हता.
वडील खूप शिस्तीचे होते, आई कधीतरी कॅडबरी घेऊन यायची तेव्हा खूप छान वाटायचं. बाबांकडे असले लाड अजिबातच नव्हते. पण मग एखादा मुलगा आपल्यासाठी चॉकलेट घेऊन येतो त्यावेळी खूप छान वाटू लागलं. आपले आईबाबा आपल्यासाठी काहीच करत नाहीयेत, त्यामुळे त्या मुलाबद्दल आपलेपणा वाटू लागला. त्यात तो मुलगा चित्रपट बघायला घेऊन जायचा तेव्हा तो मुलगा खूप चांगला आहे असं वाटायचं. केवळ अभ्यासात गुंतवून राहण्यापेक्षा त्या मुलाने केलेल्या गोष्टी मला आवडू लागल्या. बाहेर फिरायला घेऊन जाणं, चित्रपट दाखवणं हे माझे आईबाबा करून देत नव्हते. त्यामुळे कुठेतरी मी आई बाबांना पुढचं उत्तर द्यायला लागले. मी आता आई बाबांची खूप चांगली काळजी घेते असं लोक मला म्हणतात.
तेव्हा मी त्यांना हे सांगते की, मी त्यावेळी माझ्या आईबाबांना, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय? असा प्रश्न विचारला होता. मी जेव्हा वयाने ११ वर्षे मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात होते, तेव्हा एक क्षण असा आला ज्यावेळी मला माझ्या घरच्यांचा खूप राग आला. त्यांचा कंटाळा आलेला तेव्हा मी त्याला भेटले आणि आपण लग्न करूया असं म्हणाले. त्याचवेळी माझ्या आईला कुणीतरी सांगितलं की अंकिताने लग्न केलंय. त्यावेळी मी लग्न केलेलं नव्हतं पण माझ्या भावाच्या एक्स गर्लफ्रेंडने ही अफवा सगळीकडे पसरवली. माझी आई मला शोधत तिथे येणार म्हणून मी त्या मुलाच्या घरी जाऊन राहिले. कारण मी आता १८ वर्षांची झालेली होते आणि मला काय करायचं ते मी करू शकते असा त्यावेळी आत्मविश्वास होता. मी आंधळ्या प्रेमात होते त्यामुळे आईवडिलांची मला अजिबातच किंमत नव्हती.
त्या मुलाचा जॉब मुंबईत असल्याने त्याला तिथे जावं लागलं होतं पण मी त्याच्याच घरी राहून माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सहा सात महिने मी तिथे राहिले पण आता त्या कृत्याची जाणीव मला होतेय की आईबाबांना त्यावेळी काय वाटत होतं. या सगळ्यात माझं त्या मुलाशी लग्न होईल किंवा नाही ती गोष्ट वेगळी होती पण त्याची आई मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यांनी माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला होता. पण दीड महिन्यातच मला जाणीव झाली की प्रेम बिम काही नसतं, आईवडीलच सर्वस्व असतात. पण त्यानंतर परत कसं जायचं म्हणून माझ्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. माझ्या बाबतीत सगळ्यांना माहीत झालं होतं त्यामुळे त्या चार लोकांना मी कुठल्या तोंडाने उत्तर देणार असे प्रश्न मनात येत होते. एकदीड वर्ष गेले त्यात मी शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला.
तू काहीच करू शकणार नाहीस, तुला इंजिनिअरिंगला सुद्धा कमी मार्क्स मिळताहेत. तू फक्त भांडीच घासशील असे जेव्हा लाईफ पार्टनरच आपल्याबद्दल असं बोलायला लागतो तेव्हा तुम्ही डीमोटिव्हेट होता. आणि तेच माझ्याबाबतीत सतत होत राहिलं. पण मी एक म्हणेन की माझं त्याच्यासोबत लग्न जरी झालं नव्हतं तरी ती माझी सासूच होती, तिने मला प्रेरणा दिली. ती माझ्यासाठी आईच होती. पण दोन वर्षानंतर सतत त्याच त्याच गोष्टी पाहून मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. तो मुलगा छान वागेल माझ्याशी हा विचार यायचा पण तसं मुळीच घडत नव्हतं. शेवटी आईवडील आपल्याला पुन्हा घरात घेतील की नाही ही धाकधूक होती, पण आई वडिलांनी मला समजावून घेतलं. दोन वर्षानंतर त्यांना कळलं की मी त्या मुलाशी लग्न केलं नव्हतं. खर तर तो मुलगा सुधारेल या आशेने मी त्याच्या घरी राहत होते.
पण तसं अजिबातच घडत नसल्याने मी आई वडिलांकडेच राहील असा ठाम निर्णय घेतला. आम्ही दोघे आता रिलेशनशिपमधून बाहेर पडलोय पण कधीच एकमेकांच्या विरोधात कोणाजवळ बोललो नाही. पण जिथे मी आता लोकप्रिय झाली आहे तेव्हा काही लोक जाणून बुजून जुन्या गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न करतात. मी या गोष्टी मुद्दामहून लोकांसमोर आणल्या आहेत. जेव्हा माझ्या या गोष्टी लोकांना समजल्या तेव्हा अनेकांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या. एका मुलीची आई तर सांगत होती की माझी मुलगी चुकली आणि तिने हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ती आईजवळ ढसाढसा रडली होती. मुली चुकतात, धडपडतात पण एक गोष्ट आहे की पालकांनी त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं. तिला त्यातून बाहेर पडायला प्रोत्साहन द्या असे अंकिता म्हणते.