१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान पिळले होते. मराठी कलाकारांनी त्यांचा स्वतःचा मान जपायला हवा असे त्यांनी परखडपणे मत मांडले होते. बहुतेक कलाकार हे समाजात वावरताना टोपणनावाने एकमेकांना हाक मारतात. त्यामुळे तुम्हीच जर तुमचा मान जपला नाही तर लोकं तुम्हाला मान कसा देतील असे म्हणत कलाकारांचे त्यांनी कान पिळले होते. राज ठाकरे यांनी मांडलेले हे मत प्रेक्षकांनाच नाही तर कलासृष्टीतील सगळ्यांनाच मान्य होते. यावर आता स्वतः आनंद इंगळे यांनी त्यांच्या टोपणनावावरून केल्या जाणाऱ्या मस्करीबद्दलही मत मांडलं आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या या मुलाखतीत कलाकारांना अंड्या, पचक्या नावाने हाक मारली जाते असे म्हटले होते. आनंद इंगळे यांना या इंडस्ट्रीत अंड्या नावानेच ओळखले जाते. त्यांच्या जवळचे मित्रमंडळी टीव्ही मुलाखतिवेळी त्यांना अंड्या नावानेच हाक मारत असत, त्यामुळे हे नाव सर्वश्रुत झाले होते. राज ठाकरे यांनी याच मुद्द्याला हात घातल्याने आनंद इंगळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. नुकत्याच आरजे सोनालीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत एक खुलासा करताना म्हटले आहे की, राज साहेब याअगोदरही हे बोलले होते. पण त्यांनी जाहीरपणे हा मुद्दा मांडल्याने मला एक सुखद धक्का बसला. त्यांचा मुद्दा मला पटला, कोणीतरी माझ्या टोपणनावाने हाक मारून माझी किंमत कमी होतेय असं नाही. पण सगळ्या जणांसाठी ह्या सगळ्या गोष्टी नसतात. ही लाईन मला इथे अधोरेखित करावीशी वाटते.
हे सगळ्या कलाकारांनी पाळलं पाहिजेच. पण कुठल्याही कार्यक्रमात किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणं थांबवावं. कारण काही कार्यक्रमातून मी अत्यंत कुचका माणूस आहे असं विनोद म्हणून बनवलं जातं. तेव्हा मला वाटतं की ह्या गोष्टीचा नंतर खूप वेगळा परिणाम होतो. आपणच नॅशनल टेलिव्हिजनवर ही गोष्ट जपायला हवी, आपल्या वैयक्तिक आयुष्यात जपायला हवी. राज साहेब ठाकरेंचं म्हणणं मला १०० टक्के पटलं. असे म्हणत आनंद इंगळे यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी एक मुद्दा अधोरेखित करताना म्हटले की, कार्यक्रमात तुमच्यावर विनोद करून तुमची प्रतिमा बदलवली जाते ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. यामुळे प्रेक्षकही आपल्याला त्याच दृष्टीने गृहीत धरत असतात. हा मुद्दा उपस्थित करणं खूप महत्त्वाचं होतं आणि म्हणून राज ठाकरे यांचे इथे कला सृष्टीतून कौतुक करण्यात येत आहे.